William Shakespeare London house | विल्यम शेक्सपिअरचे लंडनमधील घर अखेर सापडले

William Shakespeare London house |
William Shakespeare London house | विल्यम शेक्सपिअरचे लंडनमधील घर अखेर सापडले
Published on
Updated on

लंडन : जगातील सर्वात प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर याच्याबद्दल एक मोठी ऐतिहासिक माहिती समोर आली आहे. लंडनमधील ब्लॅकफ्रायर्स भागात शेक्सपिअरचे स्वतःचे घर होते, हे जरी माहीत असले, तरी त्याचे नेमके स्थान, आकार आणि रचना आजवर एक रहस्य होते. मात्र, एका जुन्या आर्काइव्हमध्ये सापडलेल्या 1668 च्या नकाशाने हे रहस्य आता उलगडले आहे.

किंग्स कॉलेज लंडनमधील प्राध्यापिका ल्युसी मुन्रो लंडनमधील जुन्या नाट्यगृहांचा अभ्यास करत असताना त्यांना लंडन आर्काइव्हमध्ये 1668 चा एक नकाशा सापडला. या नकाशाची तुलना जेव्हा त्यांनी शेक्सपिअरच्या घराच्या ऐतिहासिक वर्णनाशी केली, तेव्हा त्यांना या घराचे नेमके स्थान आणि आराखडा सापडला. हे घर इंग्रजी एल अक्षराच्या आकाराचे होते. तसेच ब्लॅकफ्रायर्स गेटहाऊसच्या वरच्या बाजूला आणि साइन ऑफ द कॉक टॅव्हर्न या प्रसिद्ध खानावळीच्या शेजारी होते. प्रारंभी हे घर आकाराने बरेच मोठे होते. पुढे जाऊन त्याचे दोन घरांमध्ये रूपांतर करण्यात आले होते.

शेक्सपिअरच्या आयुष्याबद्दल नवीन माहिती

या शोधामुळे शेक्सपिअरच्या आयुष्याशी संबंधित काही जुने समज मोडीत निघाले आहेत. 1613 मध्ये ग्लोब नाट्यगृहाला आग लागल्यानंतर शेक्सपिअर आपल्या गावी स्ट्रॅटफोर्डला परत गेला आणि तिथूनच काम करू लागला, असा समज होता. मात्र, हे घर 1613 मध्ये त्याने विकत घेतले होते, त्यामुळे निवृत्तीचा गैरसमज दूर झाला आहे. शेक्सपिअरचे लंडनशी असणारे नातेही या घरामुळे अधोरेखित झाले आहे. लंडनमधील हे घर ग्लोब नाट्यगृहापासून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर होते. याचा अर्थ असा की, 1616 मध्ये मृत्यू होण्यापूर्वीच्या काळातही शेक्सपिअर लंडनच्या व्यावसायिक आणि नाट्यसृष्टीशी सक्रियपणे जोडलेला होता. या काळात तो जॉन फ्लेचर यांसारख्या तरुण नाटककारांसोबत मिळून नाटके लिहित होता.

‘घराचा हा शोध आपल्याला शेक्सपिअरची एक वेगळी प्रतिमा देतो. तो केवळ एक एकाकी प्रतिभावान लेखक नव्हता, तर तो इतरांशी सहकार्य करणारा, नाट्यगृहांमध्ये शेअर्स मालकी असलेला आणि लंडनमध्ये गुंतवणूक करणारा एक सक्रिय व्यावसायिक होता’, असे निरीक्षण संशोधक प्रा. ल्युसी मुन्रो यांनी नोंदवले आहे.

शेक्सपिअरच्या ग्लोब थिएटरचे संचालक विल टॉश यांनी या शोधाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते, या शोधामुळे लंडन या शहराचे शेक्सपिअरच्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शेक्सपिअरच्या मृत्यूनंतर 400 वर्षांहून अधिक काळ लोटला असला, तरी त्यांच्याबद्दलची अनेक गुपिते आजही उलगडणे बाकी आहेत. हा शोध म्हणजे इतिहासाच्या कोडीतील एक अत्यंत महत्त्वाचा तुकडा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news