

मयुरेश वाटवे
नवी दिल्लीत जंतर-मंतरवर झालेल्या नीट पेपरफुटी विरोधातील विद्यार्थी आंदोलनात काही जणांनी वापरलेली भाषा हा चर्चेचा विषय झाला आहे. काही जणांना विद्यार्थ्यांच्या तोंडची शिवराळ भाषा ‘कूल’ वाटली. हेच न्यू नॉर्मल असेल, तर शालीनता आता शोकेसमध्येच ठेवावी लागणार.
जंतर-मंतरवरचे आंदोलन विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर संपुष्टात आले. हा लढा जेवढा मैदानावर होता, तेवढाच सोशल मीडियावरही लढला गेला. रिल्स, व्हिडीओ आणि परस्परविरोधी मतांनी सोशल मीडिया भरून वाहत होता. 'शिमगा संपला, कवित्व उरले' असे आपण म्हणतो. तसेच या आंदोलनात वापरलेली भाषा चर्चेचा विषय राहिली. काही विद्यार्थ्यांच्या तोंडात सतत अर्वाच्य शिव्या, बोटांचा यथेच्छ वापर... ही मुले मनात येईल ते बोलतात, हा कौतुकाचा विषय कसा काय होऊ शकतो? ‘आता म्हाताऱ्या माणसांना रिटायर करून नवीन पिढीच्या हाती सत्ता द्या, हा तरुणांचा देश आहे, आम्ही देश चालवू’ अशी भाषा आंदोलनात वापरली गेली. उद्या संसदेत जाऊन ही मुले हीच भाषा वापरणार आहेत का?
शिव्या या ओव्यांएवढ्याच जुन्या आहेत असे म्हटले जाते; पण शिव्या कोणासमोर द्याव्यात, याला काही सामाजिक यमनियम आहेत. या आंदोलनात ते धाब्यावर बसवले गेले. वाल्याला ‘राम राम’ म्हणता येत नाही म्हणून तू ‘मरा मरा’ म्हण म्हणजे आपोआप त्याचे ‘राम राम’ होईल असे बाळबोध संस्कार झालेली पिढी आज अस्तंगाला जात आहे. पुराणातली ही वानगी बालीश वाटावी असे ‘डी के बोस’ आज जन्माला आलेले आहेत. त्यांच्या भाषेला कोणता विधिनिषेध नाही. मनात येईल ते बोलून मोकळे होणे हा अपवादात्मक स्थितीत कौतुकाचा विषय असू शकतो. वारंवार असे घडत असेल, तर त्याला ‘फाटक्या तोंडाचा’ म्हणतात. हे कौतुक नाही, हे समजण्याएवढी तरी अक्कल आपल्याला हवी.
भाषा हे संस्कृतीचे कवच आहे. ज्या समाजाची भाषा घसरते, त्या समाजाची नैतिकता हळूहळू खाली येऊ लागते. जंतर-मंतरवरील काही जणांनी वापरलेली शिवराळ भाषा चुकीची होती, हे जेन झीला ठणकावून सांगितले पाहिजे. मागण्या योग्य असल्या म्हणजे सर्व मार्ग योग्य आहेत असे नव्हे. यापूर्वीही विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आंदोलने केली आहेत; पण भाषा कधीच अशी नव्हती. जेवढे व्हल्गर बोलू तेवढे व्हायरल होऊ, हाच आजचा मंत्र दिसतो. तरुणांना वाटू लागले आहे की, आक्रमकता म्हणजेच नेतृत्व. ओरडणे म्हणजेच खरे बोलणे. बोट दाखवणे म्हणजेच धाडस आहे; पण खरे तर हे हतबलतेचे लक्षण आहे. मुद्दे संपले की, माणूस गुद्द्यावर येतो असे म्हणतात. ते इथे लागू नाही, असे कसे म्हणता येईल? या भाषेचे कौतुक करणारा एक वर्गही तयार झाला आहे. ‘हीच खरी बंडखोर भाषा आहे’ असे म्हणणारे लोक आहेत.
घरात कुणीही आपल्याला असे बोलायला शिकवत नाही; पण आज वेबसीरिजची भाषा पाहा. मागची व पुढची पिढी एकत्र ते शो पाहू शकत नाही, एवढी त्यातील भाषा शिवराळ असते. सोशल मीडियावरही अलीकडे तुम्ही एखादी पोस्ट टाकली की, त्या खाली येणाऱ्या कमेंटस, त्याची भाषा पाहा. अहिंसेचे समर्थकही या भाषेचे समर्थन करत आहेत. ही भाषिक हिंसाच आहे. शिवराळ भाषा बोलणारी व्यक्ती वाईट असते असे नाही; पण ‘बुक इज जज्ड बाय इटस् कव्हर’ असे म्हटले जाते. ते खोटे आहे का? उद्या हेच आंदोलनकर्ते खासदार होतील. ते तिथे जाऊनही अशीच भाषा वापरणार आहेत? ‘संसदीय शब्दांची’ व्याख्या नवीन पिढी नव्या पद्धतीने लिहिणार आहे का?
काही जण म्हणतात, ‘ही तरुणांची ऊर्जा आहे. त्यांना मोकळे सोडा.’ पण, ऊर्जेला दिशा हवी, हेही तेवढेच खरे नाही का? भाषेला शालीनतेचा लगाम हवाच. आज कॅमेऱ्यासमोर शिव्या देणारा तरुण उद्या नोकरीसाठी मुलाखतीला जाणार आहे. आज प्रत्येकाचे डिजिटल फूटप्रिंट दिसतात. आर्थिक शिस्त तपासायला सिबिल स्कोअर तपासतात, तसे उद्या नोकरी देणाऱ्यांनी तुमची सोशल मीडिया हिस्ट्री तपासायचे ठरवले, तर काय होईल, याची कल्पना करा. ते होणारच आहे. मागण्या, आंदोलन, वाद-प्रतिवाद होतच राहतील; पण भाषेला सुट्टी देता नये. शालीनता ही सार्वजनिक जीवनात मिरवायची गोष्ट आहे. शोकेसमध्ये ठेवण्याची नाही.