

न्यूयॉर्क : अवकाश विज्ञानाच्या इतिहासात 2029 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सुमारे 375 मीटर रुंदीचा अपोफिस नावाचा महाकाय लघुग्रह 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीच्या अतिशय जवळून जाणार आहे. या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपानची जाक्सा या दोन बलाढ्य संस्थांनी रॅमसेस मोहिमेद्वारे हातमिळवणी केली आहे.
अपोफिस पृथ्वीपासून केवळ 32,000 किलोमीटर अंतरावरून प्रवास करेल. हे अंतर पृथ्वी आणि चंद्राच्या अंतराच्या साधारण दहापट कमी आहे. जरी या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नसला, तरी इतक्या जवळून जाणारा लघुग्रह शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाची मोठी संधी आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा या लघुग्रहावर काय परिणाम होतो, हे पाहणे रॅमसेस मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पृथ्वीच्या संरक्षणासाठी ही मोहीम निर्णायक ठरेल. जाक्साचे संचालक फुजीमोटो मासाकी यांच्या मते, “रॅमसेस मोहीम होणे काळाची गरज आहे.” या मोहिमेत जाक्सा आपले 3 रॉकेट आणि प्रगत थर्मल इन्फ्रारेड इमेजर तंत्रज्ञान पुरवणार आहे, तर इसा मोहिमेचे नियोजन आणि वैज्ञानिक विश्लेषण करणार आहे.
फ्रेंच शास्त्रज्ञ पॅट्रिक मिशेल यांच्या मते, निसर्ग स्वतःहून ही संधी आपल्याला देत आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण या लघुग्रहाची कक्षा कशी बदलते आणि त्याच्या संरचनेत काय बदल होतात, याचा अभ्यास केल्यास भविष्यात पृथ्वीकडे येणार्या धोकादायक लघुग्रहांची दिशा बदलणे शास्त्रज्ञांना सोपे जाईल.