

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर कधीकाळी जीवसृष्टी होती का, या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर देणारे पुरावे कदाचित तिथल्या खडकांमध्येच कायमचे अडकून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकन सिनेटने ‘मार्स सॅम्पल रिटर्न’ (एम.एस.आर.) कार्यक्रमासाठी निधी नाकारल्याने ही मोहीम आता जवळपास रद्द झाल्याचे चित्र आहे.
सोमवारी (15 जानेवारी) अमेरिकन सिनेटने खर्च विधेयक मंजूर केले. यामध्ये नासाच्या इतर विज्ञानाशी संबंधित बजेटमध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी, ‘मार्स सॅम्पल रिटर्न’ कार्यक्रमाला मात्र अपवाद ठरवून त्याचा निधी रोखण्यात आला आहे. ‘हा करार सध्याच्या एम.एस.आर. कार्यक्रमाला पाठिंबा देत नाही, असे कायदेतज्ज्ञांनी अहवालात नमूद केले आहे. नासाचे पर्सिव्हरन्स रोव्हर सध्या मंगळावर 30 पेक्षा जास्त भूगर्भीय नमुने गोळा करून बसले आहे. यात अशा एका नमुन्याचा समावेश आहे, ज्याचे वर्णन नासाने ‘मंगळावरील जीवसृष्टीचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट चिन्ह’ असे केले होते.
ही मोहीम रद्द झाल्यामुळे हे नमुने पृथ्वीवर आणण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी 2025 मध्ये एका स्वतंत्र समितीने या मोहिमेचा खर्च तब्बल 11 अब्ज डॉलर्स (सुमारे 92 हजार कोटी रुपये) इतका होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार, हे नमुने 2040 पर्यंतच पृथ्वीवर पोहोचू शकले असते. नासाने खर्च कमी करण्यासाठी व्यावसायिक पर्यायांचा (खासगी क्षेत्र) विचार केला होता, ज्यामध्ये 5.8 ते 7.1 अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित होता.
यावर 2026 मध्ये निर्णय घेतला जाणार होता; परंतु त्यापूर्वीच सिनेटने निधीला कात्री लावली आहे. मोहीम रद्द झाली असली तरी नासाकडे एक संधी शिल्लक आहे. सिनेटने ‘मार्स फ्युचर मिशन्स’साठी 110 दशलक्ष डॉलर्स मंजूर केले आहेत. हे पैसे रडार, लँडिंग सिस्टम आणि प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वापरले जातील. हेच तंत्रज्ञान भविष्यात ‘मार्स सॅम्पल रिटर्न’ पुनरुज्जीवित करण्यासाठी किंवा चंद्रावरील मानवी मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकते.