ऑस्ट्रेलिया धडकणार आशिया खंडाला?

ऑस्ट्रेलिया धडकणार आशिया खंडाला?
Pudhari File Photo
Published on
Updated on

कॅनबेरा : वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, ऑस्ट्रेलिया खंड हळूहळू आशिया खंडाकडे म्हणजेच उत्तर दिशेने सरकत आहे. हा खंड दरवर्षी 2.8 इंच म्हणजेच 7 सेंटिमीटर इतक्या वेगाने सरकू लागला आहे. त्यामुळे भविष्यात हा खंड आशिया खंडाला धडकू शकतो. या सरकण्यामुळे भूवैज्ञानिक परिवर्तन पाहायला मिळू शकते. विशेषत:, एखाद्या क्षेत्रातील परिद़ृश्य, जैव विविधता आणि हवामानातील बदल पाहायला मिळू शकतात.

ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक झेंग-जियांग ली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, हा एक चक्रीय पॅटर्नचा भाग आहे, ज्यामध्ये खंड वेगवेगळे होतात आणि पुन्हा एकत्र येतात. ही प्रक्रिया पृथ्वीच्या इतिहासात अनेक वेळा झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेली ही हालचाल ‘प्लेट टेक्टोनिक्स’ नावाच्या एका विशाल भूवैज्ञानिक प्रक्रियेचा भाग आहे. ती कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीच्या खंडांना आकार देत आली आहे. सुमारे 8 कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिकापासून वेगळा झाला होता आणि गेल्या 5 कोटी वर्षांपासून तो सातत्याने उत्तर दिशेला सरकत आहे. वैज्ञानिकांचे अनुमान आहे की, ऑस्ट्रेलियाला आपल्यासोबत घेऊन जात असलेली इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट आशिया खंडाला धडकू शकते. त्यामुळे महत्त्वाचे भूवैज्ञानिक आणि पर्यावरणाशी निगडित परिवर्तन घडेल. विशेषत:, ऑस्ट्रेलिया आणि आशियादरम्यान भविष्यात ही धडक जैव विविधतेत परिवर्तन आणेल. ऑस्ट्रेलियात कांगारू, वॉम्बॅट आणि प्लॅटिपससारखे अनोखे प्राणी आहेत. हा खंड आशिया खंडाला धडकला आणि जोडला गेला, तर अशा पूर्णपणे वेगळ्या प्रजातींसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचे हे सरकणे केवळ भविष्यासाठीच नव्हे, तर वर्तमानकाळातही समस्या निर्माण करीत आहे. 2016 मध्ये आढळले होते की, या खंडाच्या सरकण्यामुळे जीपीएस कॉर्डिनेट सिस्टीम 1.5 मीटरपर्यंत सरकली होती. खंडांमधील बदलांमुळे नेविगेशन सिस्टीममध्येही बरेच बदल घडू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news