

अस्ताना : कझाकिस्तानच्या गवताळ प्रदेशात २०० वर्षांनंतर जगातील अखेरचे उरलेले खरे जंगली घोडे परतले आहेत. याच वर्षी २२ ऑगस्टच्या सकाळी कझाकिस्तानच्या स्टेपी परिसरातील एका वन्यजीव अभयारण्यात ७ वर्षांच्या प्रजेवाल्स्की मादीने एका पिल्लाला जन्म दिला. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम (UNEP) नुसार, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन शतकांत या गवताळ प्रदेशात जन्मलेला हा पहिलाच प्रजेवाल्स्की घोडा असावा. या घटनेच्या बरोबर ८ दिवसांनंतर, ६ वर्षांच्या ‘उम्ब्रा’ नावाच्या मादीने आणखी एका नर पिल्लास जन्म दिला.
प्रजेवाल्स्की घोड्यांच्या या जन्मांमुळे त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे. ही घटना अत्यंत खास आहे, कारण या घोड्यांना एकेकाळी नामशेष झाले असल्याचे मानले गेले होते. १९६९ मध्ये गोबीच्या वाळवंटात हे घोडे मोकाट फिरताना अखेरच्या वेळी दिसले होते. कझाकिस्तानने अलीकडेच या घोड्यांच्या संवर्धनासाठी एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. २०२४ पासून आतापर्यंत युरोपमधील प्राणिसंग्रहालयांतून २२ प्रजेवाल्स्की घोडे कझाकिस्तानच्या ‘अलिबी रीइंट्रोडक्शन सेंटर’मध्ये आणले गेले आहेत. २०२९ पर्यंत येथे एकूण ४० घोडे आणण्याची योजना आहे. प्रजेवाल्स्की घोड्यांना पृथ्वीवर उरलेले ‘अखेरचे खरे जंगली घोडे’ म्हटले जाते आणि ही जात अत्यंत दुर्मीळ आहे.
प्रजेवाल्स्की घोड्यांच्या संवर्धनासाठी काम करणारे अल्बर्ट सालेमगेरेयेव यांनी पहिल्या घोड्याच्या जन्माची आठवण सांगताना म्हटले की, २२ ऑगस्टच्या सकाळी अभयारण्यातील एका सहकाऱ्याचा त्यांना फोन आला. ते कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथून १२ तास गाडी चालवून ‘अलिबी रीइंट्रोडक्शन सेंटर’ येथे पोहोचले. त्यांनी सांगितले की, जेव्हा ते पोहोचले तेव्हा नवजात पिल्लू आपल्या आईच्या जवळ बसले होते आणि त्याचे पाय अजूनही थरथरत होते. एकेकाळी प्रजेवाल्स्की घोडे मध्य आशियाच्या मैदानांवर मोठ्या संख्येने फिरत असत. त्यांची लहान आणि मजबूत शरीरयष्टी या परिसरातील कडक थंडीत शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत योग्य असते. १९०० च्या दशकाच्या मध्यात अवाढव्य शिकार, शेतीमुळे राहण्याची जागा कमी होणे आणि पाळीव जनावरांशी झालेली स्पर्धा यामुळे त्यांचे कळप नष्ट होत गेले. हे घोडे केवळ युरोपमधील प्राणिसंग्रहालयांमध्ये सुरक्षित राहिले, जिथे एका मोठ्या ब्रिटिंग प्रोग्राममुळे त्यांचे ‘जेनेटिक पूल’ सुरक्षित ठेवण्यास मदत झाली.