

टोकियो : जपानमध्यो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी एक अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याद्वारे वाय-फाय सिग्नल्सच्या मदतीने खोलीचे अचूक आणि उच्च-रिझोल्यूशन चित्र तयार केले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाला ‘लेटेंट सीएसआई (LatentCSI)’ असे नाव देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान वाय-फाय डेटाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने एका डिजिटल पेंटब्रशमध्ये रूपांतरित करते.
आपल्या सभोवताली असलेली वाय-फाय उपकरणे सतत सिग्नल्स पाठवत आणि प्राप्त करत असतात. हे सिग्नल्स फक्त उपकरणांपर्यंतच नव्हे, तर भिंती, फर्निचर आणि खोलीतील इतर वस्तूंना आदळून परत येतात. या डेटाला चॅनल स्टेट इन्फॉर्मेशन (CSI) म्हणतात. पूर्वी सीएसआय डेटा वापरून केवळ खोलीचा एक अस्पष्ट नकाशा तयार करता येत होता, पण आता एआयने हा नकाशा अधिक अचूक बनवला आहे. संशोधकांनी सीएसआय डेटाला ‘लेटेंट स्पेस’ मध्ये रूपांतरित केले आणि नंतर तो स्टेबल डिफ्यूजन 3 (Stable Diffusion 3) सारख्या प्रगत एआय मॉडेलशी जोडला. लेटेंट स्पेस म्हणजे प्रतिमेचा एक संकुचित (Compressed) फॉर्म असतो, ज्यावर एआय अधिक चांगल्या प्रकारे प्रक्रिया करू शकतो.
या प्रक्रियेमुळे आता खोलीची फोटो-रिअलिस्टिक प्रतिमा तयार करणे शक्य झाले आहे. लेटेंटसीएसआयच्या मदतीने केवळ खोलीचे अचूक चित्र मिळत नाही, तर ही प्रणाली खोलीत उपस्थित असलेल्या व्यक्तींची स्थिती आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा (ट्रॅक) देखील घेऊ शकते. म्हणजेच, जर एखादी व्यक्ती खोलीत फिरत असेल, तर तिचे रिअल-टाइम स्थान देखील यात दाखवता येते. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षा आणि पाळत ठेवण्याचे (Surveillance) नवीन मार्ग खुले होऊ शकतात, पण त्याचबरोबर गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. जर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले गेले, तर वाय-फाय सिग्नल्सचा वापर पाळत ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
सध्या हे तंत्रज्ञान केवळ संशोधन स्तरावर आहे आणि फक्त अशाच खोल्यांवर काम करू शकते ज्यांचे प्रशिक्षण एआयला आधीच दिलेले आहे. म्हणजेच, कोणत्याही नवीन खोलीचा नकाशा त्वरित तयार करणे सध्या शक्य नाही. लेटेंटसीएसआय तंत्रज्ञान एआय आणि वाय-फायच्या संयोगाने भविष्यातील इमेजिंगचे एक नवीन पर्व लिहित आहे. हे तंत्रज्ञान एका बाजूला खोलीचा अचूक डिजिटल नकाशा सादर करते, तर दुसर्या बाजूला गोपनीयतेबद्दल चिंता देखील वाढवत आहे. आगामी काळात हे तंत्रज्ञान किती प्रगती करते आणि त्याचा वापर किती सुरक्षित राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.