Earth Rotation | पृथ्वी वेगाने धावतेय, तरीही का नाही जाणवत?

why-we-dont-feel-earths-fast-rotation
Newsband Office
Published on
Updated on

वॉशिंग्टन : या क्षणी तुम्ही प्रचंड वेगाने अवकाशातून प्रवास करत आहात. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाप्रमाणेच, तुम्हीदेखील एका मोठ्या प्रवासाचा भाग आहात; कारण आपली पृथ्वी वेगाने फिरत आहे. तरीही पृथ्वीचा वेग आपल्याला का जाणवत नाही, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

आपली पृथ्वी सातत्याने दोन मुख्य प्रकारे फिरत असते.

1) स्वतःभोवती फिरणे (Rotation) : पृथ्वी स्वतःभोवती एका भिंगरीप्रमाणे फिरते आहे. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत पृथ्वीच्या मध्यातून जाणार्‍या काल्पनिक रेषेभोवती हे फिरणे सुरू असते. पृथ्वी दर 24 तासांत तिची एक पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करते. विषुववृत्तावर या फिरण्याचा वेग सुमारे 1,670 किलोमीटर प्रतितास (सुमारे 1,000 मैल प्रतितास) असतो.

2) सूर्याभोवती फिरणे (Revolution) ः पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरत असताना, ती सूर्याभोवतीही प्रवास करत असते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तिला एक वर्ष लागते. या प्रवासादरम्यान पृथ्वीचा सरासरी वेग तब्बल 1,07,000 किलोमीटर प्रतितास (सुमारे 67,000 मैल प्रतितास) असतो. तुम्ही आजवर प्रवास केलेल्या कोणत्याही वाहनाच्या वेगापेक्षा हे वेग अनेक पटीने जास्त आहे. मग, आपल्याला चक्कर का येत नाही? आपण अवकाशात फेकले का जात नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याला पृथ्वीची ही प्रचंड गती का जाणवत नाही? खगोलशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या एका तज्ज्ञांच्या मते, या प्रश्नाचे उत्तर भौतिकशास्त्राच्या सोप्या नियमांमध्ये दडलेले आहे.

1) पृथ्वीची गती आहे स्थिर :

मनोरंजक उद्यानातील (Amusement Park) मेरी-गो-राऊंडमध्ये फिरताना तुम्ही गती अनुभवता; कारण ते अचानक वेग पकडते, थांबते किंवा पटकन वळते, म्हणजेच तिची गती ‘अस्थिर’ असते. याउलट, पृथ्वीची गती विलक्षणपणे स्थिर आहे. गेल्या अब्जावधी वर्षांपासून पृथ्वी याच वेगाने स्वत:भोवती फिरत आहे आणि सूर्याभोवती फिरत आहे. यात कोणताही अचानक धक्का किंवा थांबा नाही.

2) गतीतील बदल अतिशय मंद : सूर्यप्रदक्षिणेचा मार्ग लंबवर्तुळाकार असल्याने पृथ्वीचा वेग थोडा बदलतो. सूर्याजवळ असताना थोडा जास्त आणि लांब असताना थोडा कमी; पण हे बदल इतके हळू आणि ‘स्मूथ’ होतात की, ते आपल्याला अजिबात जाणवत नाहीत.

3) विमानात बसल्याप्रमाणे अनुभव : कल्पना करा की, तुम्ही क्रूझिंग उंचीवर असलेल्या विमानात बसला आहात. विमान शेकडो मैल प्रतितास वेगाने उडत असले, तरी आतील वातावरण शांत आणि स्थिर वाटते. तुम्ही आरामात चालू शकता; कारण विमान, तुम्ही आणि विमानात असलेली प्रत्येक गोष्ट एकाच वेगाने, एकाच दिशेने प्रवास करत आहे. अगदी याचप्रमाणे, आपण पृथ्वीची गती अनुभवत नाही; कारण आपण सर्वजण... तुम्ही, तुमची खुर्ची, झाडे, इमारती आणि महासागर, या ग्रहाबरोबर त्याच वेगाने प्रवास करत आहोत. जोपर्यंत पृथ्वी अचानक वेग वाढवत नाही, थांबत नाही किंवा दिशा बदलत नाही, तोपर्यंत तुमच्या शरीराला ही गती ओळखण्यासाठी कोणताही फरक आढळत नाही. (आणि सुदैवाने, असे घडत नाही.) या संकल्पनेला समजून घेण्यासाठी, तुम्ही एका मोठ्या बीच बॉलवर सरपटणार्‍या लहान मुंगीची कल्पना करू शकता. तो चेंडू कितीही वेगाने फिरला, तरी मुंगीला चेंडूच्या तुलनेत तिच्या गतीत फरक जाणवत नाही. याच तत्त्वावर आपणही पृथ्वीवर स्थिर आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news