Red Indicators on Highways | मध्य भारताच्या महामार्गांवर आता लाल निर्देशक, त्याचा अर्थ काय?

Red Indicators on Highways
मध्य भारताच्या महामार्गांवर आता लाल निर्देशक, त्याचा अर्थ काय?pudhari File Photo
Published on
Updated on

भोपाळ : आतापर्यंत तुम्ही महामार्गांवर पांढर्‍या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या निर्देशक खुणा पाहिल्या असतील. आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच थोड्या फार फरकाने या निर्देशकांचा मूळ उद्देश काय आहे, याची कल्पना असते. मात्र, आता अगदी नव्या रंगाने रस्त्यावर निर्देशक आखण्यात आले असून, हा नवा बदल काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नव्या निर्देशकांसाठी चक्क लाल रंग वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे इतर सामान्य निर्देशक रेषांप्रमाणे या लाल रंगाच्या रेषा नाजूक नसून मोठ मोठे पॅच मारल्याप्रमाणे हे निर्देशक आहेत. आता या लाल रंगाच्या मोठ्या पॅचसारख्या निर्देशकांचा अर्थ काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर जोपर्यंत तुम्ही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये रस्ते मार्गे प्रवास करत नाही, तोपर्यंत याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, सध्या हे निर्देशक केवळ याच राज्यांमधील एका ठरावीक रस्त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येत आहेत; पण या लाल रंगाच्या निर्देशकांचा अर्थ फारच उपयुक्त असून, लवकरच हे सर्वत्र वापरण्यास सुरुवात झाली, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

हे लाल निर्देशक ज्या मार्गावर काढले आहेत तो मार्ग आहे, जबलपूर-भोपाळ राष्ट्रीय महामार्ग! राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 असा या रस्त्याचा कोड आहे. हा महामार्ग मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमधून जातो, ज्याची सुरुवात भोपाळजवळील ओबेदुल्लागंज येथून होते आणि जबलपूर मार्गे बिलासपूरपर्यंत पोहोचतो. या मार्गावरील घाटातील भागांमध्ये आणि वन्य क्षेत्र असलेल्या भागांमध्ये रस्त्यावर मोठमोठ्या आकाराचे लाल रंगाचे पट्टे काढण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांना अपघातांपासून वाचवण्यासाठी हा महामार्ग रंगीत करण्यात आला आहे. येत्या काळात या प्रयत्नांमुळे शेकडो प्राण्यांना वाचवण्याचे उद्दिष्ट साध्य होण्याची अपेक्षा आहे.

जबलपूर आणि भोपाळ राष्ट्रीय महामार्गाचा 12 किलोमीटरचा भाग हा वन्य क्षेत्र आणि संवेदनशील वन्यजीवन असलेल्या भागातून जातो. मध्य प्रदेशातून जाताना हा महामार्ग वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो. तो नौरादेही वन्यजीव अभयारण्यातूनही जातो. कोल्हे आणि हरीण यांसारखे प्राणी पूर्वी अनेकदा या वर्दळीच्या रस्त्यावरून जाताना दिसायचे. वाहने या मार्गावरून प्रचंड वेगाने जात असल्याने अचानक एखादा प्राणी आडवा आला, तर त्या प्राण्यांना अपघातात जीव गमावावा लागायचा. या भागात अगदी नीलगायीसारख्या मोठ्या प्राण्यांनादेखील वाहनांनी धडक दिल्याची उदाहरणे आहेत. हळूहळू हा परिसर धोकादायक क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला.

याच समस्येचे निराकरण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआयने) दोन किलोमीटरच्या भागात टेबलटॉप लाल बेस तयार केला. हा उंचावलेला भाग नेहमीच्या रस्त्यापेक्षा थोडा वर आहे. या रस्त्यावर रंगवलेल्या रंगीत पट्ट्या पाच मिलीमीटर जाडीच्या आहेत. त्यामुळे त्या अगदीच सहज लक्षात येतात. या खुणा दिल्यावर वेग कमी करणं अपेक्षित आहेच; पण हे रंगकाम करताना जाणूनबुजून अधिक जाडी ठेवण्यात आल्यामुळे रंगाच्या पोताने चालकांना त्यावरून गाडी चालवताना थोडासा धक्का जाणवतो. त्या छोट्या कंपनाच्या माध्यमातून चालकांना वेग कमी करण्यास सांगितले जाते. या भागात वन्यप्राण्यांचा वास असून, प्राणी जवळपासून जात असतील, असे सूचित करण्याचा हा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news