China Relationship Coach | चीनमध्ये महिला घेत आहेत ‘रिलेशनशिप कोच’ची मदत

दुरावलेले प्रेम परत मिळवून देण्याचा दावा!
China Relationship Coach |
China Relationship Coach | चीनमध्ये महिला घेत आहेत ‘रिलेशनशिप कोच’ची मदत
Published on
Updated on

बीजिंग : एखाद्या जवळच्या व्यक्तीशी नाते तुटणे कोणासाठीही सोपे नसते. सामान्यतः लोक ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी कुटुंब आणि मित्रांचा आश्रय घेतात किंवा हळूहळू आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सध्या चीनमध्ये एक भलताच ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे. दुरावलेल्या प्रियकराला किंवा माजी पतीला पुन्हा आयुष्यात परत आणण्यासाठी चीनमधील अनेक तरुण महिला ‘रिलेशनशिप कोच’ची मदत घेत आहेत आणि त्यासाठी भरमसाट पैसे मोजत आहेत.

हे कोच स्वतःला प्रेम आणि नात्यांचे तज्ज्ञ सांगून एक्स पार्टनरला परत मिळवून देण्याचे दावे करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक महिलांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये नाते जपण्यासाठी आणि जोडण्यासाठी रिलेशनशिप कोचिंगची भली मोठी इंडस्ट्री उभी राहिली आहे. हे कोच लोकांना अशा काही युक्त्या शिकवण्याचा दावा करतात, ज्यामुळे दुरावलेला पार्टनर आपोआप परत येतो. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनमधील ‘वान’ नावाच्या २८ वर्षीय महिलेने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी एका कोचशी संपर्क साधला. यासाठी तिने ३,५०० युआन (सुमारे ४० हजार रुपये) मोजले. या बदल्यात तिला महिनाभर मार्गदर्शन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

धक्कादायक म्हणजे, काही हाय प्रोफाईल रिलेशनशिप कोच त्यांच्या प्रीमियम पॅकेजसाठी ३,००० डॉलर म्हणजेच सुमारे ३ लाख रुपयांपर्यंत फी आकारतात. वान हिने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोचने तिच्याशी ९० मिनिटे मोफत फोनवर संवाद साधला. तिच्या लहानपणीच्या आठवणी आणि भावनांचा अभ्यास करून तिला असुरक्षिततेचा त्रास असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एक्स बॉयफ्रेंडला पुन्हा आकर्षित करण्यासाठी एक महिन्याचे विशेष पॅकेज घेण्यास भाग पाडण्यात आले.

कोचिंगचे विचित्र नियम : १. सुरुवातीचे २१ दिवस एक्स बॉयफ्रेंडशी कोणताही संपर्क करायचा नाही. २. स्वतःचा लूक आणि व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलायचे. ३. सोशल मीडियावर काय पोस्ट करायचे, मेसेजला कधी व कसा प्रतिसाद द्यायचा याचे कडक नियम पाळायचे. वान हिने कोचच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड परत येईल याची वाट पाहिली. पण घडले भलतेच! तिच्या माजी प्रियकराने तिला चॅट ॲपवर ब्लॉक करून टाकले. जेव्हा वानने कोचला त्यांच्या ‘९० टक्के यश मिळण्याच्या’ दाव्याबद्दल विचारणा केली, तेव्हा तिला कोणतेही योग्य उत्तर मिळाले नाही. उलट अधिक अनुभवी मेंटर मिळवण्यासाठी तिला १.१५ लाख रुपयांचे (९,८०० युआन) दुसरे महागडे पॅकेज घेण्याचा सल्ला देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news