

गुंडम पेंटा : ‘पुष्पा : द राईज’नंतर ‘पुष्पा-2’ चित्रपट रीलिज झाला आहे. अभिनेता अल्लू अर्जुनच्या या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली आहे. शेषाचलम जंगलातील रक्तचंदन एवढे महाग का आहे?, त्याची तस्करी का होते? असे अनेक प्रश्न हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना पडला असेल. येथील रक्तचंदनाच्या तस्करीचे एकंदरीत रॅकेट आणि ते इतके महाग का, हा अर्थातच औत्सुक्याचा विषय आहे.
शेषाचलम डोंगरांची लांबी सुमारे 80 किलोमीटर आणि रुंदी सुमारे 40 किलोमीटर आहे. जगातील चीन, जपान, सिंगापूर आणि यूएई या देशांमध्ये रक्तचंदनाची खूप जास्त मागणी आहे. परदेशात मागणी असल्याने या लाकडाची तस्करी होते. रक्तचंदन दुर्मीळ आहे, त्यामुळे याची तस्करी होते. आंध्र प्रदेशच्या तिरुपती व कडप्पा डोंगरांमध्ये पसरलेल्या शेषाचलमच्या जंगलात आढळणारं रक्तचंदन शैव आणि शाक्त संप्रदायातील लोक पूजेसाठी वापरतात. आंध्र प्रदेशात रक्तचंदनाचे झाड कापण्यावर बंदी आहे, ते लाकूड राज्याबाहेर नेणं बेकायदेशीर आहे. गेल्या काही वर्षांत येथील रक्तचंदनाच्या झाडांची संख्या जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. इंडिया टुडे मॅगझीनच्या रिपोर्टनुसार, रक्तचंदनाची तस्करी करून 1200 टक्के फायदा व्हायचा. त्यामुळेच तस्कर जीव धोक्यात घालून दरवर्षी जवळपास दोन हजार टन रक्तचंदन चेन्नई, मुंबई, तुतीकोरिन व कोलकाता बंदरांवरून नेपाळमार्गे चीनमध्ये पोहोचवायचे.
तस्करीसाठी चादर, मोहरीची ढेप, नारळाचा भुगा व मीठ यामध्ये लपवून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेले जायचे. तस्करांना पकडण्यासाठी अनेक वेळा मोहिमा राबविण्यात आल्या. 2015 मध्ये झालेल्या चकमकीत अनेक तस्कर मारले गेले. रक्तचंदनाच्या तस्करीबाबत कडक कायदा आहे. रक्तचंदनाची तस्करी करताना आढळल्यास 11 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. रक्तचंदन दुर्मीळ आहे. याची झाडे आंध्र प्रदेश, तामिळनाडू व कर्नाटकमध्ये आढळतात. त्याच्या उत्पादनात हवामान महत्त्वाचा घटक आहे. ही झाडे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये वाढतात. रक्तचंदनाची लाकडं गडद लाल रंगाची असतात. यापासून उच्च दर्जाचे फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. पारंपरिक औषधांमध्ये अनेक शतकांपासून रक्तचंदनाचा वापर केला जात आहे. हे संधिवात आणि त्वचेच्या इन्फेक्शनवरील उपचारांसाठी वापरलं जातं. यातील अँटिसेप्टिक गुण जखमा लवकर बर्या करण्यास मदत करतात. रक्तचंदनाची किंमत त्याची गुणवत्ता आणि मागणीच्या आधारे ठरते. टीओआयच्या रिपोर्टनुसार, रक्तचंदनाची सरासरी किंमत 50 हजार ते एक लाख रुपये प्रति किलो आहे. जर ते उच्च दर्जाचे असेल तर त्याची किंमत दोन लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचते. मागणी वाढल्याने रक्तचंदनाची तस्करीही वाढली.