

साओ पाउलो : निसर्गाच्या नियमानुसार ‘स्वजातीला खाणे’ (Cannibalism) ही गोष्ट आपल्याला विचित्र किंवा भयानक वाटू शकते; मात्र सापांच्या जगात ही एक ‘धोरणात्मक’ खेळी असल्याचे समोर आले आहे. ‘बायोलॉजिकल रिव्ह्यू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, सापांच्या विविध प्रजातींमध्ये स्वजातीला खाण्याची प्रवृत्ती उत्क्रांतीच्या दरम्यान किमान 11 वेळा स्वतंत्रपणे विकसित झाली आहे. ब्राझीलच्यायुनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो येथील संशोधकांनी सापांच्या स्वजातीभक्षणाच्या सुमारे 500 अहवालांचा अभ्यास केला.
या संशोधनातून पुढील महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत :
पर्यावरणीय ताण : जेव्हा अन्नाची कमतरता असते किंवा संसाधने मर्यादित असतात, तेव्हा साप स्वतःच्याच प्रजातीच्या दुसर्या सापाला खाणे पसंत करतात.
फायदेशीर रणनीती : संशोधक ब्रुना फाल्काओ यांच्या मते, ‘मानवांसाठी हे घृणास्पद असले, तरी सापांच्या द़ृष्टीने हे त्यांच्या अस्तित्वासाठी आणि पारिस्थितिक तंदुरुस्तीसाठी (Ecological Fitness) फायदेशीर आहे.
‘लोकसंख्या नियंत्रण : काही वेळा स्वतःच्या पिल्लांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी किंवा संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. शास्त्रज्ञांनी पूर्वी या वागण्याला ‘चुकीची उत्क्रांती’ (Maladaptive) मानले होते. मात्र, आता हे सिद्ध झाले आहे की, हा एक संधीसाधू शिकारीचा प्रकार आहे. नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर झेवियर ग्लॉडस यांनी फ्रान्समधील ‘मॉन्टपेलियर’ सापांचे उदाहरण दिले, जिथे नर साप मादी सापांना खातात. विशेषतः विणीचा हंगाम नसताना जेव्हा अन्नाची प्रचंड टंचाई असते, तेव्हाच हे घडते. सापांव्यतिरिक्त कोळी आणि प्रेईंग मेंटिस यांच्यातही स्वजातीभक्षण मोठ्या प्रमाणावर आढळते. मादी कोळी अनेकदा मिलनाच्या वेळी नराला खाऊन टाकते, जे तिच्या पोषणासाठी उपयुक्त ठरते. सापांमध्येही अशीच प्रवृत्ती उत्क्रांतीच्या प्रवासात वारंवार दिसून आली आहे.