

नॉक्सव्हिल : आपल्यापैकी अनेकांना प्राणीसंग्रहालयात जाऊन प्राण्यांच्या गमतीजमती पाहायला आवडतात. विशेषतः, सकाळी जेव्हा प्राणी सर्वात जास्त सक्रिय असतात, तेव्हा त्यांचे निरीक्षण करणे ही एक पर्वणीच असते; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, चिम्पांझी ज्या सहजतेने त्यांच्या पायाचा वापर हातासारखा करतात, तसा आपण का करू शकत नाही? एका जैविक मानववंशशास्त्रज्ञाने यामागचे रंजक शास्त्रीय कारण स्पष्ट केले आहे.
नॉक्सव्हिलमधील प्राणीसंग्रहालयात ‘रिप्ली’ नावाच्या एका चिम्पांझीच्या हालचालींनी शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. रिप्ली केवळ हातानेच नव्हे, तर पायाचा वापर करूनही आपली न्याहारी गोळा करत होता. जेवण झाल्यानंतर तो पायाच्या बोटांनी पाण्याचे पाईप पकडणे, पेंढा उचलणे किंवा खेळण्यांशी खेळणे यांसारखी कामे हातांच्या बोटांइतक्याच सहजतेने करत होता. माणूस आणि चिम्पांझी यांच्या डीएनएमध्ये 98.8 टक्के साम्य असूनही, आपल्या पायाच्या हालचाली चिम्पांझींच्या तुलनेत मर्यादित आहेत.
आपण आपली पायाची बोटे एक-एक करून स्वतंत्रपणे हलवू शकत नाही, याचे मुख्य कारण आपल्या शरीराची रचना आणि उत्क्रांती यात दडलेले आहे. लाखो वर्षांपूर्वी मानवाचे पूर्वज चिम्पांझीप्रमाणेच हात आणि पाय या दोन्हींचा वापर करून हालचाल करत असत. मात्र, काळाच्या ओघात मानवाने दोन पायांवर सरळ चालायला सुरुवात केली. सरळ चालताना शरीराचा समतोल राखणे आणि संपूर्ण वजन पेलणे ही पायांची मुख्य जबाबदारी बनली. चालताना तोल जाऊ नये, यासाठी मानवी पायाची बोटे स्वतंत्रपणे हलण्याऐवजी एकमेकांना आधार देणारी बनली. याच काळात मानवी हातांचा वापर हत्यारे बनवण्यासाठी आणि सूक्ष्म कामांसाठी वाढला. परिणामी, हाताची बोटे अधिक लवचिक आणि स्वतंत्रपणे हालचाल करण्यास सक्षम झाली. मानवी हात आणि पाय यांची शरीररचना वरवर सारखी वाटत असली, तरी त्यात महत्त्वाचे फरक आहेत :
मानवी पाय : यात 29 स्नायू असतात, जे प्रामुख्याने चालणे आणि उभे राहताना संतुलन राखण्यासाठी काम करतात. मानवी हात : यात 34 स्नायू असतात. अधिक स्नायू आणि त्यांच्या विशिष्ट रचनेमुळेच आपण चित्र काढणे, मेसेज टाईप करणे किंवा वाद्ये वाजवणे यांसारखी गुंतागुंतीची कामे करू शकतो. थोडक्यात सांगायचे, तर निसर्गाने आपल्या हातांना ‘कौशल्यासाठी’ आणि पायांना ‘स्थिरतेसाठी’ विकसित केले आहे. म्हणूनच चिम्पांझीचे पाय जरी आपल्याला ‘मल्टिटास्किंग’ वाटत असले, तरी मानवी पाय आपल्याला जगातील एकमेव ‘दोन पायांवर चालणारा प्रगत प्राणी’ बनवण्यासाठी तयार झाले आहेत.