Brain transplant science | मानवी मेंदूचे प्रत्यारोपण का अशक्य आहे?

Brain transplant science |
Brain transplant science | मानवी मेंदूचे प्रत्यारोपण का अशक्य आहे?
Published on
Updated on

फिनिक्स (अ‍ॅरिझोना) : अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना येथील ‘अल्कोर’ संस्थेमध्ये सध्या 150 हून अधिक मानवी डोकी (विभक्त केलेली डोकी) क्रायोजेनिक चेंबर्समध्ये अत्यंत थंड तापमानात जतन करून ठेवण्यात आली आहेत. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात एवढी प्रगती होईल की, या मेंदूंना नवीन शरीरात प्रत्यारोपित करून पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने हे करण्यात आले आहे. परंतु, आजचे विज्ञान क्रायोजेनिक पद्धतीने जतन केलेला मेंदू पुन्हा सक्रिय करू शकत नाही. मग लोक या तंत्रज्ञानाचा अवलंब का करत आहेत? जर ती डोकी ‘ताजी’ असतानाच नवीन शरीराला जोडली असती तर? थोडक्यात सांगायचे, तर आजच्या काळात ‘ब्रेन ट्रान्सप्लांट’ किंवा मेंदूचे प्रत्यारोपण करणे का अशक्य आहे?

‘मेडिकल कॉलेज ऑफ विस्कॉन्सिन’ येथील न्यूरोसर्जरीचे सहायक प्राध्यापक डॉ. मॅक्स क्रुकॉफ यांच्या मते, या प्रक्रियेला ‘मेंदू प्रत्यारोपण’ म्हणण्याऐवजी ‘शरीर प्रत्यारोपण’ म्हणणे अधिक योग्य ठरेल. हृदय किंवा यकृत प्रत्यारोपणासारखे हे नाही. जर एखाद्या शरीरात दुसरा मेंदू बसवला, तर ती व्यक्ती पूर्णपणे एक नवीन माणूस बनेल. कारण, डॉ. क्रुकॉफ सांगतात, ‘तुमचे अस्तित्व, तुमची ओळख आणि तुमची निर्णयक्षमता ही तुमच्या मेंदूत सामावलेली असते.’ तांत्रिक भाषेत सांगायचे, तर सध्या हे प्रत्यारोपण अशक्य असण्याचे मुख्य कारण म्हणजे मध्यवर्ती मज्जासंस्थेतील मज्जातंतूंचे संपर्क जाळे पुन्हा जोडणे डॉक्टरांना अद्याप जमलेले नाही.

मध्यवर्ती मज्जासंस्थेत मेंदू आणि पाठीच्या कण्याचा समावेश होतो. शरीरातील इतर भागांमधील मज्जातंतू कापले गेल्यास ते कालांतराने स्वतःची पुनर्निर्मिती करू शकतात आणि शेजारील पेशींशी संवाद साधू शकतात. मात्र, प्रौढ मानवाच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये नवीन न्यूरॉन्स (मज्जापेशी) तयार होऊ शकतात याचे फार कमी पुरावे आहेत आणि झाले तरी ते अत्यंत मर्यादित प्रमाणात होते. माणसाच्या आयुष्यभरात न्यूरॉन्स नवीन कनेक्शन्स तयार करतात (ज्याद्वारे आपण गोष्टी शिकतो), परंतु हा मार्ग विज्ञानाला अजून इतका अचूक समजलेला नाही की, त्याचा वापर प्रत्यारोपणासाठी करता येईल. मेंदूचा एक छोटा भाग, जसे की ‘सेरेबेलम’ बदलणेदेखील सध्याच्या घडीला अशक्य आहे. सेरेबेलममध्ये ‘पुर्किंजे पेशी’ नावाचे लाखो विशेष न्यूरॉन्स असतात. यातील प्रत्येक पेशी इतर हजारो न्यूरॉन्सकडून संकेत स्वीकारत असते. डॉ. क्रुकॉफ म्हणतात, ‘या जोडण्यांची संख्या घातांकीय (Exponential) आहे, जी हाताळणे सध्या आमच्या क्षमतेच्या पलीकडे आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news