

लंडन : आपल्यापैकी बहुतेकजण जांभईला केवळ झोप किंवा थकव्याचे लक्षण मानतात. मात्र, ब्रिटनचे प्रसिद्ध सर्जन आणि हेल्थ कंटेंट क्रिएटर डॉ. करण राजन यांच्या मते, जांभई दिल्यानंतर जर तुम्हाला आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत असतील, तर तो कोणताही ब्रम नसून त्यामागे एक पूर्ण वैज्ञानिक प्रक्रिया कार्यरत आहे.
डॉ. करण राजन यांच्या सांगण्यानुसार, जेव्हा आपण जांभई घेतो, तेव्हा आपल्या कानाच्या आतील ‘युस्टेशियन ट्यूब’ उघडते. ही ट्यूब मध्यकर्णाला घशाशी जोडते आणि ती सामान्यतः बंद असते. जांभई घेताना जेव्हा जबडा ताणला जातो, तेव्हा ही ट्यूब उघडते आणि कानाच्या आतील हवेचा दाब बाहेरील हवेच्या दाबाशी समान होतो. जेव्हा कानाच्या आतील हवेचा दाब संतुलित होतो, तेव्हा कानाचा पडदा अधिक चांगल्या प्रकारे लहरी निर्माण करू शकतो. याचा थेट परिणाम असा होतो की, आवाज अधिक स्पष्ट आणि तीक्ष्ण ऐकू येतात.
जांभई घेताना कानातील ‘टेन्सर टिम्पानी’ आणि ‘स्टेपिडियस’ हे दोन लहान स्नायू सक्रिय होतात. हे स्नायू काही काळासाठी आवाज दाबतात. परंतु, ते शिथिल होताच ऐकण्याची क्षमता सुधारल्यासारखी वाटते. हवाई प्रवासात कान ‘पॉप’ होण्याचा जो अनुभव येतो, अगदी तसाच परिणाम जांभईमुळे होतो. या दोन्ही परिस्थितीत कानाचा दाब संतुलित केला जातो. फरक एवढाच की, जांभईच्या वेळी मेंदूतील रक्तप्रवाहदेखील वाढतो, ज्यामुळे ऐकण्याची क्षमता थोड्या काळासाठी तीव्र होते. डॉ. राजन यांच्या मते, जांभई एक प्रकारचा ‘अकूस्टिक डिफेन्स रिफ्लेक्स’देखील असू शकतो. म्हणजेच, शरीराच्या आत निर्माण होणार्या आवाजांपासून (उदा. स्वतःचा आवाज किंवा दात खाणे) कानाचे संरक्षण करण्यास हे मदत करते.