

नवी दिल्ली : तुम्ही निरीक्षण केलेच असेल की, हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत बोलताना किंवा श्वास बाहेर टाकताना तोंडातून वाफ येते. हॉलीवूड चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की, परदेशात थंड वातावरण असते म्हणून तेथील रहिवाशांच्या तोंडातून वाफ येते; पण भारतातही थंडीचे प्रमाण वाढले की, आपल्याही तोंडातून वाफ येते. याबाबत अनेकांना फारच नवल वाटते; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, ही वाफ नक्की येते तरी कुठून? आणि तोंडातून येणारी ही वाफ केवळ हिवाळ्यातच का येते उन्हाळ्यात का नाही? चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमके कारण.
आपले शरीर 70 टक्के पाण्याने बनलेले असते. तसेच आपल्या फुफ्फुसांमध्येही काही प्रमाणात ओलसरपणा असतो. जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा केवळ कार्बन डायऑक्साईडच बाहेर पडत नाही, तर शरीरातील उष्णता आणि आर्द्रताही बाहेर पडते. ही आर्द्रता गॅसच्या स्वरूपात बाहेर पडते, जे डोळ्यांना दिसत नाही. हिवाळ्यात वातावरणातील तापमान जवळजवळ 37 अंश सेल्सियस इतके असते. त्यामुळे जेव्हा श्वास बाहेर टाकला जातो, तेव्हा गॅसच्या स्वरूपात बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड वायूवर, शरीरातील उष्णतेवर आणि आर्द्रतेवर बाहेरील थंड वातावरणाचा परिणाम होतो.
वातावरणातील थंडाव्यामुळे डोळ्यांना न दिसणारी ही आर्द्रता पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये रूपांतरीत होते, ज्यामुळे तोंडातून वाफ आल्यासारखे वाटते. आता याउलट उन्हाळ्यात बाहेरील वातावरणाच्या तापमानाचे प्रमाण शरीराच्या तापमानाच्या आसपास असते. जवळपास असते. त्यामुळे श्वास सोडताना तोंडातून बाहेर पडणार्या कार्बन डायऑक्साईड वायूवर आणि उष्णतेवर बाहेरील वातावरणाचा काहीच परिणाम होत नाही, म्हणजेच पाण्याच्या थेंबात रूपांतरीत होत नाहीत. यामुळे केवळ थंडीमध्येच तोंडातून वाफ येते आणि उन्हाळ्यात असे नाही होत. हिवाळ्यात तोंडातून वाफ येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण जर तोंडातून येणार्या वाफेचे प्रमाण जास्त असेल, तर मात्र तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
हिवाळ्यात सर्दी-खोकला यासारखे सामान्य आजार होण्याचे प्रमाण अधिक असते; पण तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल आणि नाक बंद होऊन तोंडाने श्वास घ्यावा लागत असेल, तर तोंडातून जास्त वाफ येते. काहीवेळा हे इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. याशिवाय काहीजणांना तोंडाने श्वास घेण्याची सवय असते. यामुळे नाकाऐवजी तोंडातून हवा शरीराच्या आत गेल्याने थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचते. ज्यामुळे घसा कोरडा पडणे, फुफ्फुसांच्या समस्या जाणवणे, श्वास नीट न घेता आल्यामुळे झोपेत अडथळे येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच तोंडातून वाफ येणे नैसर्गिक आहे; पण यासोबत नाक बंद असणे, घसा दुखणे, खोकला किंवा श्वसनाचे इतर त्रास असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञ सांगतात.