

लंडन : आपण जेव्हा ‘धातू’ असा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लोखंड, अॅल्युमिनियम किंवा स्टीलसारखे कडक आणि मजबूत पदार्थ येतात. मात्र, निसर्गात याला एक मोठा अपवाद आहे, तो म्हणजे ‘पारा’. पारा हा असा एकमेव धातू आहे जो खोलीच्या सामान्य तापमानाला (रूम टेम्परेचर) द्रव अवस्थेत असतो. पण असे का? याचे उत्तर त्याच्या अणूंच्या रचनेत दडलेले आहे.
पार्याचा द्रवणांक (मेल्टिंग पॉईंट) उणे 38.8 अंश सेल्सिअस इतका कमी आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयातील रसायनशास्त्राच्या वरिष्ठ अधिव्याख्याता झो अॅशब्रिज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोणताही पदार्थ किती तापमानाला वितळेल हे त्यातील अणूंच्या बंधांच्या मजबुतीवर अवलंबून असते. हे बंध जेवढे घट्ट, तेवढी त्यांना तोडण्यासाठी जास्त उष्णता लागते.’ सर्वसाधारणपणे धातूंमध्ये ‘मेटॅलिक बाँडिंग’ असते. यात धन प्रभारित कण एका जाळ्यासारख्या रचनेत असतात आणि त्यांच्याभोवती इलेक्ट्रॉनचा मुक्त वावर असतो. हे मुक्त इलेक्ट्रॉन्स एखाद्या डिंकासारखे काम करतात, जे धातूला घट्ट पकडून ठेवतात. यामुळेच धातूंमधून वीज वाहू शकते आणि त्यांना हवा तो आकार देता येतो. पार्याच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे.
आवर्त सारणीतील (पिरिऑडिक टेबल) ‘ग्रुप 12’ चा धातू असल्याने पार्याकडे सिद्धांतानुसार बाहेर पडण्यासाठी 12 इलेक्ट्रॉन्स असतात. मात्र, पार्याची एक खास अडचण आहे: स्थिर कवच : पार्याचे सर्व बाह्य इलेक्ट्रॉन्स हे पूर्णपणे भरलेल्या कवचांमध्ये असतात. इलेक्ट्रॉन्स देण्यास नकार : पूर्ण भरलेली कवचे अत्यंत स्थिर असतात. त्यामुळे पार्याचे अणू आपले इलेक्ट्रॉन्स मोकळे करण्यास किंवा दुसर्या पार्याच्या अणूशी शेअर करण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. कमकुवत आकर्षण : इलेक्ट्रॉन्स मुक्त न झाल्यामुळे पार्याच्या अणूंमधील आकर्षण बल अत्यंत कमकुवत राहते. या कमकुवत आकर्षणामुळेच पार्याचे अणू एकमेकांना घट्ट पकडून ठेवू शकत नाहीत आणि तो धातू असूनही द्रव अवस्थेत राहतो.