

नवी दिल्ली : सात ते आठ तास झोपणे शरीरासाठी आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यास ताजेतवाने वाटते आणि शरीरातील ऊर्जा देखील टिकून राहते. कधीकधी रात्री अचानक झोपमोड होते, पण या समस्येचा तुम्ही वारंवार सामना करत असाल तर शरीर तुम्हाला गंभीर संकेत देतंय; त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे तज्ज्ञ सांगतात. झोपमोड होण्यामागील कारणे आणि अशा वेळेस काय करावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
रात्रीच्या वेळेस झोप मोडण्यामागील कारणं असंख्य असू शकतात. शारीरिकपासून ते मानसिक कारणांसह काही आजारही कारणीभूत असू शकतात. वाढत्या वयोमानानुसार झोपेवर परिणाम होऊ शकतात. जसजसे वय वाढते तसतसे शरीराच्या झोपेच्या घड्याळ्यावरही परिणाम होतो. परिणामी रात्रीअपरात्री जाग येते. मानसिक ताणतणावामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतात, यामुळे झोपमोड होते. तज्ज्ञांच्या मते घाबरून तुम्ही झोपेतून जागे झाल्यास रक्तदाबाच्या पातळीमध्ये बदल होतो आणि हृदयाच्या ठोक्यांची गतीही वाढते. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या औषधांमुळेही झोपेवर परिणाम होऊ शकतात.
सर्दी-खोकल्याची औषधे तसंच नैराश्य कमी करण्यासाठी सुरू असलेल्या औषधोपचारांमुळेही रात्रीची झो मोड होऊ शकते. यकृताची कार्यप्रणाली योग्य प्रकारे सुरू नसणे, हे देखील रात्री 1 वाजेपासून ते 3 वाजेदरम्यान झोपमोड होण्यामागील कारण असू शकते. यकृत योग्य पद्धतीने काम करत नसल्यास रक्ताभिसरण प्रक्रियेवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे झोपमोड होऊ शकते. तणावामुळेही यकृताच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतात. रात्रीची झोपमोड होण्यामागे अन्य असंख्य कारणंही असू शकतात. उदाहरणार्थ संधिवात, नैराश्य, न्युरोपॅथी मेनोपॉज, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होणे, थायरॉइड ग्रंथींमुळे झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे स्लीप एपनिया यासारख्या आजाराचाही सामना करावा लागू शकतो.
रात्रीच्या वेळेस झोपमोड झाल्यास सर्वप्रथम शांत राहावे आणि जास्त ताण घेऊ नका. झोप का येत नाहीय, याचा विचार करून वारंवार घड्याळ पाहणे, यामुळे चिंता, तणाव अधिक वाढू शकतो. झोप येत नसल्यास दीर्घ श्वास घ्यावा आणि मेडिटेशन करावे. तुमच्या रूम आणि पलंगाची परिस्थिती देखील झोप न येण्यास कारणीभूत ठरू शकते. रूम आणि पलंग स्वच्छ असणं आवश्यक आहे. पलंगावर पडून राहा, हळूहळू श्वास घ्या आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करा. मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर करणं टाळावे.