

नवी दिल्ली : सध्याच्या विज्ञानयुगात मानवाने काही नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याचे पूर्वानुमान लावण्याचे तंत्र विकसित केलेले आहे. त्यामध्ये वादळे, अतिवृष्टी आदींचा समावेश होतो. मात्र, भूकंपाचे पुर्वानुमान लावणे हे अत्यंत कठीण असते. अचानक आलेल्या अशा धक्क्यांनी मोठीच जीवित आणि वित्तहानी होत असते. तिबेटच्या टिंगरी काऊंटीमध्ये 7 जानेवारीला झालेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या भूकंपाची तीव्रता इतकी तीव्र होती की, नेपाळपासून भारताच्या उत्तर भागापर्यंत जमीन हादरून गेली. या भूकंपात आतापर्यंत 126 जणांचा मृत्यू झाला असून, 130 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशी एकच घटना नाही, तर अनेक घटना समोर येत असतात. पृथ्वी पुन्हा पुन्हा अशी का थरथरते, असा प्रश्न मनात निर्माण होतो. तसेच पृथ्वीखाली काय घडते, ज्यामुळे भूकंप होतो, हेदेखील जाणून घ्या.
पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग शांत आणि स्थिर दिसतो, परंतु त्याच्या आत नेहमीच हालचाली सुरू असतात. भूगर्भीय प्लेटस्च्या धडकेमुळे दरवर्षी शेकडो भूकंप होतात. अनेक भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आपली पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेटस्वर स्थित आहे. जेव्हा या प्लेटस् एकमेकांना धडकतात, तेव्हा बाहेर पडणार्या ऊर्जेमुळे भूकंप होतो. पृथ्वीखालील या प्लेटस् अतिशय संथगतीने फिरतात. दरवर्षी या प्लेटस् त्यांच्या जागेपासून 4-5 मिमीने हलतात. या दरम्यान काही प्लेटस् एकमेकांपासून दूर जातात, तर काही एकमेकांच्या खाली सरकतात. या हलत्या आणि धडकण्याच्या प्रक्रियेमुळे भूकंप होतात. भूकंपाचे केंद्र म्हणजे पृथ्वीच्या आत खडक तुटतात किंवा आदळतात. याला ‘फोकस किंवा हायपोसेंटर’ म्हणतात. भूकंपाची ऊर्जा या केंद्रातून लहरींच्या स्वरूपात पसरते. जेव्हा या लाटा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतात तेव्हा स्पंदने जाणवतात. जिथे ही ऊर्जा पृष्ठभाग कापते, त्याला केंद्रबिंदू म्हणतात. हे भूकंपाच्या सर्वात जवळचे आणि प्रभावी ठिकाण आहे.
पृथ्वीची रचना भारतीय-ऑस्ट्रेलियन भूप्रदेश, उत्तर अमेरिकन भूप्रदेश आणि आफ्रिकन भूप्रदेश अशा सात मोठ्या भूप्रदेशात विभागलेली आहे. या भूखंडांखालील खडक कमालीच्या दाबाखाली आहेत. जेव्हा हा दाब एका मर्यादेपेक्षा जास्त होतो, तेव्हा खडक तुटतात आणि वर्षानुवर्षे जमा झालेली ऊर्जा बाहेर पडते. पृथ्वीचा पृष्ठभाग विशाल प्लेटस्चा बनलेला आहे, जो महासागर आणि खंडांमध्ये पसरलेला आहे. या थरांखालील खडक समुद्राच्या खाली जड आणि खंडाखाली हलके असतात. जेव्हा खडक तुटतात तेव्हा ही ऊर्जा पृष्ठभागावर पोहोचते आणि विनाश घडवून आणते. भूकंपाचा सर्वाधिक परिणाम त्याच्या केंद्राजवळील भागात होत आहे. केंद्रापासूनचे अंतर जसजसे वाढत जाते, तसतशी भूकंपाची तीव्रता आणि नुकसानीची पातळी कमी होते. भूकंपाचा केंद्रबिंदू खोल असेल तर भूकंपाचा परिणाम पृष्ठभागावर कमी जाणवतो. मात्र, जर केंद्र पृष्ठभागाच्या जवळ असेल तर त्याचा विध्वंसक परिणाम जास्त होतो.