

सिडनी : मुंग्या या पृथ्वीवरील सर्वात यशस्वी जीवांपैकी एक मानल्या जातात. जगभरात त्यांच्या सुमारे 22,000 प्रजाती आढळतात. उष्णकटिबंधीय ऑस्ट्रेलियामध्ये मुंग्यांची मोठी जैवविविधता आहे आणि एकट्या त्या भागात सुमारे 5,000 प्रजाती असल्याचे संशोधकांचे मत आहे. मुंग्या पृथ्वीवर इतक्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याने त्यांचा आपल्या घरात प्रवेश होणे काही आश्चर्यकारक नाही; पण त्या आपल्या घरात कशा आणि का येतात? हे जाणून घेऊया.
मुंग्या अत्यंत सामाजिक प्राणी असून, त्या एका संघटित पद्धतीने जीवन जगतात. त्यांच्या वसाहतींमध्ये हजारो कामकरी मुंग्या असतात. ज्या अन्न, पाणी आणि सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असतात. एका संशोधनानुसार पृथ्वीवर एका वेळी सुमारे 20 क्वाड्रिलियन (20 पाठोपाठ 15 शून्य असलेली संख्या) मुंग्या अस्तित्वात असतात. मानवी लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळेच घरांमध्ये त्यांचा शिरकाव होतो.
मुंग्या अन्नाच्या वासाकडे विशेष संवेदनशील असतात. अगदी छोट्या प्रमाणात साखर, ब—ेडचे तुकडे, फळांचे रस, किंवा उरलेले अन्न जरी घरात पडले तरी मुंग्या ते शोधून काढतात. एकदा एखाद्या मुंगीला अन्नाचा स्त्रोत सापडला की, ती फेरोमोन नावाचे रसायन सोडते. ज्यामुळे इतर मुंग्यांना तो मार्ग सापडतो. त्यामुळे जर एक मुंगी अन्नाच्या दिशेने गेली. तर काही वेळातच इतर मुंग्या त्या ठिकाणी पोहोचतात. मुंग्या केवळ अन्नच नव्हे, तर पाण्याच्या शोधातही घरात शिरतात. विशेषतः, उष्ण हवामानात किंवा पावसाळ्यात ज्या ठिकाणी ओलावा अधिक असतो तेथे मुंग्यांचा वावर वाढतो. बाथरूम, सिंक, गच्ची, किंवा भिंतींतील लहान भगदाडे यामध्ये मुंग्या आढळू शकतात.
खूप उंच मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहणार्या लोकांनादेखील मुंग्यांचा त्रास जाणवतो. त्याचे कारण म्हणजे मुंग्यांच्या पायांची विशेष रचना. त्यांच्या पायांवरील चिपकणारे छोटे केस आणि सूक्ष्म संरचना त्यांना गुळगुळीत भिंतींवरही सहज चढण्यास मदत करतात. तसेच त्या भिंतींमधील लहान अंतरांमधून किंवा विजेच्या तारा, पाईप्स यांच्यामार्गे सहज घरात पोहोचू शकतात.