Summer dehydration risks | शरीरात 60-65 टक्के पाणी असूनही डिहायड्रेशन का होते?

Summer dehydration risks |
Summer dehydration risks | शरीरात 60-65 टक्के पाणी असूनही डिहायड्रेशन का होते?
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशाच्या बहुतांश भागांत सध्या भीषण उष्णतेची लाट आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, यात सर्वाधिक धोका ‘डिहायड्रेशन’ म्हणजेच शरीरातील पाणी कमी होण्याचा आहे. गंभीर बाब म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी डिहायड्रेशन जीवघेणे ठरू शकते. मात्र, अशा वेळी एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, जर मानवी शरीर 60 ते 65 टक्के पाण्याने बनलेले आहे, तर मग उन्हाळ्यात अचानक पाण्याची कमतरता कशी भासते? हे पाणी नक्की जाते कुठे?

आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण वय, लिंग आणि आरोग्यानुसार बदलत असते. लहान मुले : यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. स्त्री-पुरुष : पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात फॅट जास्त असल्याने त्यांच्यात पाण्याचे प्रमाण थोडे कमी असते. अवयव : फुफ्फुसे, मूत्रपिंड (किडनी) आणि स्नायूंमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर हाडांमध्ये ते कमी असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपले शरीर म्हणजे पाण्याचा एखादा साठवलेला ‘टँक’ नाही. हे एका गुंतागुंतीच्या ‘वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम’सारखे कार्य करते. शरीरातील एकूण पाण्यापैकी 60 टक्के पाणी पेशींच्या आत असते, तर उर्वरित पाणी पेशींच्या बाहेर (उदा. रक्तात) असते.

शरीरातील पाण्याचा प्रत्येक थेंब काही ना काही काम करत असतो. उन्हाळ्यात हे संतुलन बिघडण्याची मुख्य कारणे अशी : तापमान नियंत्रण : जेव्हा बाहेरची उष्णता वाढते, तेव्हा शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम बाहेर टाकते. या प्रक्रियेत पाण्याची मोठी घट होते. इलेक्ट्रोलाईटस्चा र्‍हास : घामावाटे केवळ पाणीच नाही, तर शरीरातील महत्त्वाचे क्षार जसे की सोडियम आणि पोटॅशिअमदेखील बाहेर पडतात. चयापचय क्रिया : कडक उन्हामुळे शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होतात, ज्यामुळे पाण्याची गरज वाढते. विसरभोळेपणा : शरीरातून पाणी वेगाने बाहेर जात असताना, आपण त्या प्रमाणात पाणी पित नाही. ही तूट भरून न निघाल्यास डिहायड्रेशन होते.

चुकीची पेये : चहा, कॉफी (कॅफिन) किंवा अल्कोहोल यांसारख्या पेयांमुळे शरीरातील पाणी अधिक वेगाने बाहेर फेकले जाते, ज्यामुळे धोका वाढतो. शरीर आपले कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी सतत पाण्याचा वापर करत असते. टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे, पचन संस्था नीट चालवणे आणि पेशींपर्यंत पोषण पोहोचवणे यासाठी पाण्याची निरंतर गरज असते. त्यामुळे शरीरात नैसर्गिकरीत्या 60-70 टक्के पाणी असूनही, उन्हाळ्यात नियमित अंतराने पाणी पिणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news