

नवी दिल्ली : नुकतेच अमेरिकेने लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशावर हल्ला करत तेथील राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतले. व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडातील उत्तरेकडे असलेला देश. पण, बऱ्याचदा दक्षिण अमेरिका तसेच मध्य अमेरिकेतील अनेक देशांना लॅटिन अमेरिकेतील देश असे संबोधले जाते.
लॅटिन अमेरिका ही संज्ञा केवळ भौगोलिक आधारावर नाही, तर भाषा, इतिहास आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी यांवर आधारित आहे. या प्रदेशातील देशांमध्ये लॅटिन मूळ भाषांचा प्रभाव असल्यामुळे त्यांना एकत्रितपणे लॅटिन अमेरिका असे म्हटले जाते. लॅटिन अमेरिका या भागात प्रामुख्याने स्पॅनिश, पोर्तुगीज आणि फ्रेंच भाषा बोलल्या जातात. या तिन्ही भाषा प्राचीन लॅटिन भाषेपासून विकसित झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, ब्राझीलमध्ये पोर्तुगीज भाषा वापरली जाते, तर अर्जेंटिना, चिली, पेरू, कोलंबिया, मेक्सिको यांसारख्या देशांमध्ये स्पॅनिश भाषा प्रचलित आहे. हैतीसारख्या देशात फ्रेंच भाषेचा प्रभाव दिसून येतो. या समान भाषिक परंपरेमुळे या देशांना लॅटिन अमेरिका असे नाव देण्यात आले.
यामागे युरोपीय वसाहतवादी इतिहासही महत्त्वाचा आहे. 15व्या आणि 16व्या शतकात स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स या युरोपीय शक्तींनी अमेरिकेतील मोठ्या भूभागावर आपली वसाहत स्थापन केली. त्यांच्या शासनामुळे स्थानिक आदिवासी संस्कृतींवर युरोपीय प्रभाव पडला. लॅटिन मूळ, भाषा, ख्रिश्चन धर्म, प्रशासन पद्धती आणि सामाजिक रचना या प्रदेशात रूढ झाल्या. हा समान ऐतिहासिक वारसा आजही या देशांमध्ये दिसून येतो.
याउलट उत्तर अमेरिकेतील अमेरिका व कॅनडा येथे इंग्रजी भाषा आणि ब्रिटिश वसाहतवादी प्रभाव आहे. त्यामुळे त्या भागाला अँग्लो अमेरिका असे म्हटले जाते. लॅटिन अमेरिका ही संज्ञा फक्त दक्षिण अमेरिकेपुरती मर्यादित नसून, मेक्सिको, मध्य अमेरिका आणि कॅरिबियनमधील काही देशांचाही त्यात समावेश होतो. एकूणच, दक्षिण व मध्य अमेरिकेतील देशांना लॅटिन अमेरिका म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे लॅटिनमूळ भाषा, समान वसाहतवादी इतिहास आणि सांस्कृतिक साम्य होय.