

ब्युनस आयर्स : अर्जेंटिना हा देश केवळ तिथल्या निसर्गरम्य दर्या आणि सुंदर शहरांसाठीच प्रसिद्ध नाही, तर या देशाची ओळख ‘चांदी’शी जोडलेल्या रंजक कथांमुळेही आहे. अनेक दशकांपासून या देशाला ‘लँड ऑफ सिल्व्हर’ असे म्हटले जाते. एकेकाळी येथे चांदीची नदी वाहत होती, असे मानले जाते आणि त्याची चमक आजही तिथल्या संस्कृतीत पाहायला मिळते.
‘अर्जेंटिना’ हे नाव लॅटिन शब्द ‘आर्जेंटम’ (Argentum) वरून आले आहे, ज्याचा अर्थ ‘चांदी’ असा होतो. प्राचीन काळी जेव्हा स्पेन आणि पोर्तुगालचे शोधकर्ते या भागात आले, तेव्हा त्यांनी येथे मोठ्या प्रमाणात चांदी असल्याचे ऐकले होते. त्या काळी ‘रियो दे ला प्लाटा’ नावाच्या नदीची मोठी चर्चा होती. या नावाचा अर्थच ‘चांदीची नदी’ असा होतो. असे म्हटले जाते की, या नदीच्या आसपासच्या भागातून चांदीचा मोठा व्यापार चालत असे. याच कथांमुळे हळूहळू या संपूर्ण देशाला चांदीशी जोडले गेले आणि ‘अर्जेंटिना’ हे नाव जगभर प्रसिद्ध झाले.
अर्जेंटिना केवळ नावानेच नाही, तर प्रत्यक्षातही खनिजांनी समृद्ध असलेला देश आहे. आजही आधुनिक खाणकाम उद्योग या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कॅटामार्का, सांता क्रूझ, जुजुई आणि सॅन जुआन यांसारख्या प्रांतांमध्ये चांदी, सोने, तांबे आणि इतर मौल्यवान धातूंच्या खाणी आहेत. आज अर्जेंटिना हा पेरू आणि बोलिव्हियासह दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठ्या चांदी उत्पादक देशांपैकी एक आहे. पर्यटनाची आवड असलेल्या लोकांसाठी अर्जेंटिना हे एक स्वप्नवत ठिकाण आहे.
एका बाजूला बर्फाच्छादित डोंगररांगा आणि दुसरीकडे दूरवर पसरलेली मैदाने पर्यटकांना भुरळ घालतात. चांदीशी निगडीत इतिहास, प्रसिद्ध ‘टँगो’ डान्स, मधुर संगीत आणि चविष्ट खाद्यपदार्थ यांमुळे येथील प्रवास अविस्मरणीय ठरतो. ब्युनस आयर्ससारख्या शहरांमध्ये फिरताना आजही त्या जुन्या वैभवशाली इतिहासाची झलक पाहायला मिळते. निसर्ग, इतिहास आणि साहसाचे अनोखे मिश्रण असलेला हा देश म्हणूनच आजही अभिमानाने ‘लँड ऑफ सिल्वर’ म्हणून ओळखला जातो.