

न्यूयॉर्क : ‘कधीही न बुडणारे जहाज’ अशी जाहिरात करून इंग्लंडहून अमेरिकेकडे निघालेले ‘टायटॅनिक’ जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरात बुडाले. १५ एप्रिल १९१२ रोजी बुडालेल्या या जहाजाच्या माहितीवर आधारित हॉलीवूडचा ‘टायटॅनिक’ चित्रपट जगभर गाजला. या दुर्घटनेमध्ये १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्या दिवसापासून या जहाजाचे अवशेष समुद्रपृष्ठापासून सुमारे १२,५०० फूट खाली आहेत. हे अवशेष १९८५ मध्ये शोधून काढण्यात आले होते, पण ते तिथेच आहेत. त्यांना बाहेर काढलेले नाही. जहाजाची ढासळत चाललेली रचना, त्याची अत्यंत नाजूक स्थिती, जतन करण्यामधील आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियम यांसारख्या कारणांमुळे हे अवशेष आजही त्याच ठिकाणी पडून आहेत, जिथे जहाज बुडाले होते.
टायटॅनिक जहाज समुद्रपृष्ठापासून सुमारे १२,५०० फूट खोल खाली आहे. इतक्या खोलीवर पाण्याचा दाब पृष्ठभागाच्या तुलनेत सुमारे ३८० पटीने अधिक, म्हणजेच साधारण ५५०० ते ६००० पीएसआय इतका असू शकतो. अशा परिस्थितीत सामान्य उपकरणे काम करू शकत नाहीत. त्यामुळे, विशेष खोल-समुद्री पाणबुड्या आणि रिमोटद्वारे चालणारी वाहने वापरणे आवश्यक असते. एवढ्या अवाढव्य अवशेषांना बाहेर काढण्यासाठी तिला घट्ट पकडून वर उचलण्यास सक्षम अशा उपकरणांची गरज पडेल. मात्र, दाबामध्ये होणारे बदल आणि जहाजाची सध्याची अत्यंत नाजूक अवस्था यामुळे त्याला अधिक नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे.
समुद्राचे पाणी, रासायनिक प्रक्रिया आणि सूक्ष्मजीवांमुळे टायटॅनिकचे लोखंड हळूहळू नष्ट होत आहे. २०१० मध्ये शास्त्रज्ञांना जहाजाच्या गंजलेल्या भागात हॅलोमोनास टायटॅनिके नावाचा बॅक्टेरिया आढळला. यामुळे लोखंडाला गंज लागण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे जहाजावर गंजाच्या बर्फासारख्या रचना तयार झाल्या आहेत. बुडताना टायटॅनिकचे दोन मोठे तुकडे झाले. त्याचे पुढचे आणि मागचे भाग समुद्राच्या तळाशी सुमारे २००० फूट अंतरावर पडले आहेत. दोन्ही भाग अत्यंत कमकुवत झाले असल्याने त्यांना बाहेर काढणे कठीण आहे.
११४ वर्षांहून अधिक काळ समुद्रात असल्यामुळे टायटॅनिकचे लोखंड कमकुवत झाले आहे. ते बाहेर काढताना तुटण्याची शक्यता आहे. तसेच हवेशी संपर्क आल्यावर गंज रोखण्यासाठी विशेष वैज्ञानिक प्रक्रिया करावी लागेल. २०१२ मध्ये टायटॅनिकचा समावेश ‘युनेस्को’च्या समुद्राखालील सांस्कृतिक वारसा संरक्षणाच्या करारांतर्गत झाला. या कराराचा उद्देश जहाजाचे संरक्षण करणे आणि त्यातील वस्तूंची लूट किंवा व्यावसायिक वापर रोखणे हा आहे. अमेरिका आणि ब्रिटननेही त्याच्या संरक्षणासाठी नियम लागू केले आहेत.