लंडन : अलीकडील काळात काही अब्जाधीशांनी क्रायोनिक्सचा स्वीकार केल्याची माहिती समोर आली आहे. विज्ञान एक दिवस अमरत्वाचे रहस्य उलगडेल, अशी आशा या मागे असल्याची चर्चा आहे. सध्या अनेक अब्जाधीश मृत्यूनंतर त्यांचे शरीर क्रायोजेनिक पद्धतीने गोठवण्याचा निर्णय घेत आहेत. भविष्यातील तंत्रज्ञान त्यांना पुनरुज्जीवित करेल, असा यामागील हेतू आहे. पण, मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, असे कोणतेही तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाही.
मृतांचे शरीर पुनरुज्जीवित करून त्यांना पुन्हा जिवंत करणारे तंत्रज्ञान कदाचित एखाद्या विज्ञानकथेसारखे वाटेल. पण, अनेकांना या तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर विश्वास आहे. असा विश्वास बाळगणार्यांमध्ये काही श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. या व्यक्तींपैकी काहीजण मरण देखील पावले आहेत आणि त्यांचे पार्थिव एका विशेष सिस्टीमच्या हवाली केली गेली आहेत. शास्त्रज्ञांनी पुनरुज्जीवन करण्याचे तंत्रज्ञान विकसित करेपर्यंत या व्यक्तींच्या शरीराचे जतन करण्यासाठी या सिस्टीम तयार केल्या गेल्या आहेत. जेव्हा त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल, तेव्हा त्यांच्याकडे पैसे कुठून येणार? या समस्येवर देखील या व्यक्तींनी उपाय शोधला आहे. अशा व्यक्तींच्या यादीत 5,500 हून अधिक लोकांचा समावेश आहे. या हजारो व्यक्तींनी मृत्यूनंतर लगेचच फ्रीझ होण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये ब्रिटनमधील शेकडो श्रीमंतांचा समावेश आहे. त्यांनी क्रायोनिक्स म्हणून ओळखल्या जाणार्या कोट्यवधी-डॉलरच्या इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक केली आहे.
क्रायोनिक्स ही अशी प्रक्रिया आहे जी, शास्त्रज्ञांना मृत व्यक्ती परत जिवंत करण्याचा मार्ग सापडेपर्यंत प्रेत गोठवण्यासाठी वापरली जात आहे. जेव्हा या व्यक्ती भविष्यात पुन्हा जिवंत होतील तेव्हा त्या आजच्या इतक्याच श्रीमंत असतील. कारण, ‘रेझरेक्शन ट्रस्ट’ नावाची एक विशेष संस्था या व्यक्तींच्या संपत्तीचे जतन करण्याचे काम करत आहे.
ही संस्था इतर ट्रस्टसारखी आहे जिथे नियुक्त व्यक्ती किंवा वारसदार मृत्युनंतर मालमत्तेची देखभाल करतात. पण, या प्रकरणात, कायदेशीर करारात प्रेत किंवा मेंदू गोठवलेल्या व्यक्तीचेच नाव वारसदार म्हणून दिले जाते. त्यांचा न जन्मलेला वंशज म्हणून उल्लेख केला जातो. जणू त्या व्यक्ती अमर राहणार आहेत या भावनेतून तसे केले जाते. क्रायोनिक्ससाठी मोठी किंमत मोजावी लागते. पुन्हा जिवंत होण्याची इच्छा असलेल्या श्रीमंत व्यक्ती आपले शरीर गोठवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. जर या व्यक्ती भविष्यात पुन्हा जिवंत झाल्या तर त्यांनी नाव नोंदणी केलेला ट्रस्ट त्यांना आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ देईल. आता या प्रयोगाला किती यश मिळणार, याचे उत्तर मात्र भविष्याच्या उदरातच दडलेले असणार आहे.