

लंडन : जगाच्या पाठीवर कोणत्याही संस्कृती किंवा देशात गेले, तर तिथे राहणार्या मानवांपैकी साधारण 90 टक्के लोक उजवे (राईट हँडेड) असतात, तर उरलेले 10 टक्के लोक डावे (लेफ्ट हँडेड) असतात. आपल्या पूर्वज माकडांमध्ये किंवा चिंपांझींमध्ये अशी कोणतीही विशिष्ट बाजू वापरण्याची प्रवृत्ती दिसत नाही. मानव नेमका उजव्या हाताचा कसा बनला?, यामागचे गूढ उकलण्यात युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना अखेर यश आले आहे.
या संशोधनाचे सविस्तर निष्कर्ष प्रसिद्ध वैज्ञानिक मासिक बायोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधकांच्या मते, माणसाच्या उजव्या हाताच्या प्रवृत्तीचे रहस्य त्याच्या हातात नसून, त्याच्या पायांच्या उत्क्रांतीत आणि मेंदूच्या आकारात दडलेले आहे. हात आणि पायांच्या लांबीचे गुणोत्तर या संशोधनात महत्त्वाचे ठरले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे उत्क्रांतीवादी मानववंश शास्त्रज्ञ थॉमस पुशे आणि त्यांच्या संघाने माकडे आणि अॅप्स यांच्या 41 प्रजातींच्या सामाजिक, जैविक आणि वर्तणुकीचा मानवाशी तुलनात्मक अभ्यास केला. सुरुवातीला आहार, राहणीमान, वजन आणि हत्यारांचा वापर या सिद्धांतांच्या आधारे मानवाचे उजवे असणे स्पष्ट होत नव्हते. मात्र, जेव्हा संशोधकांनी मॉडेलमध्ये मेंदूचा आकार (ब्रेन साईज) आणि हात व पायांच्या लांबीचे गुणोत्तर (आर्म,लेग रेशो) दोन नवीन गोष्टी जोडल्या, तेव्हा माणसाचे उजवे असण्याचे कोडे सुटले. हे गुणोत्तर दोन पायांवर चालण्याच्या क्षमतेशी थेट संबंधित आहे.
या संशोधनानुसार, मानवाचा उजव्या बाजूकडे झुकण्याचा प्रवास दोन टप्प्यांत झाला. पहिला टप्पा दोन पायांवर उभे राहण्याचा होता. जेव्हा मानवाच्या पूर्वजांनी दोन पायांवर चालणे सुरू केले, तेव्हा त्यांचे दोन्ही हात इतर कामे करण्यासाठी मोकळे झाले. दुसर्या टप्प्यात मेंदूचा विकास आणि विस्तार झाला. जसा जसा मानवी मेंदूचा आकार मोठा होत गेला आणि त्याचा विकास झाला, तशी मेंदूच्या डाव्या भागाची क्षमता वाढली. यामुळे मानवामध्ये उजव्या हाताचा वापर करण्याची प्रवृत्ती वेगाने द़ृढ होत गेली. शास्त्रज्ञांनी या मॉडेलद्वारे नामशेष झालेल्या मानवी प्रजातींच्या हातांच्या प्रवृत्तीचाही अंदाज लावला आहे. आर्डिपिथेकस आणि ऑस्ट्रालोपिथेकस या सुरुवातीच्या प्रजातींमध्ये आजच्या गोरिला किंवा चिंपांझीप्रमाणे उजव्या हाताचा अतिशय किरकोळ वापर दिसायचा. होमो इरेक्टस आणि निअँडरथल या दोन वंशांचे संशोधन करण्यात आले. होमो वंशाच्या उदयानंतर उजव्या हाताचा वापर वाढत गेला. होमो सेपियन्स वंशाच्या उत्क्रांतीचा आजचा आधुनिक मानव हा शेवटचा टप्पा आहे, जिथे 90 टक्के लोक उजवे झाले आहेत. इंडोनेशियात आढळलेल्या होमो फ्लोरेसिएन्सिस म्हणजेच ठेंगण्या मानवाच्या बाबतीत हा नियम लागू झाला नाही. कारण त्यांचा मेंदू लहान होता आणि ते पूर्णपणे दोन पायांवर चालण्याऐवजी झाडांवर चढण्यात आणि सरळ चालण्यात संमिश्र आयुष्य जगत होते.