

लंडन : सर्वसाधारण आपण पुरुषांना सर्वाधिक झोपताना पाहिलं आहे. महिलांना असलेली कामं आणि ऑफिस-घरातील कामांची तारेवरील कसरत, मुलांसोबत घरातील मंडळांची जबाबदारी अशा अनेक गोष्टींमुळे महिला या साधारण फार कमी तास झोपतात; पण वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून महिला की पुरुष नेमकं कोणाला सर्वाधिक झोपेची गरज असते, असा सर्वसाधारण प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर एका नव्या संशोधनातून उलगडण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. नवीन अभ्यासातून असे दिसून आले की, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते. कारण त्यांचे मेंदू दिवसभर अधिक सक्रिय आणि जटिल पद्धतीने काम करत असते.
ड्यूक विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मानसिक ताण, नैराश्य, राग आणि शत्रुत्वाचे प्रमाण जास्त वाढताना दिसते. या अभ्यासानुसार, महिलांचा मेंदू एकाच वेळी अनेक कामे (मल्टीटास्किंग) हाताळतो, म्हणूनच त्या दिवसभर अधिक मेंदूची शक्ती वापरतात. याचा अर्थ असा की त्यांच्या मेंदूला पुरुषांपेक्षा योग्यरित्या विश्रांती घेण्यासाठी आणि दिवसभराच्या कामांमधून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत असतो.
याशिवाय महिलांना त्यांच्या आयुष्यात मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती यासारख्या अनेक वेळा हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागते. या बदलांचा त्यांच्या झोपेच्या पद्धतींवरही परिणाम होतो. त्यांना चांगल्या आणि अधिक झोपेची गरज वाढते. ड्यूक विद्यापीठाच्या या अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. जेव्हा त्यांना पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा त्यांना चिंता, नैराश्य आणि चिडचिडेपणासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
पुरुषांपेक्षा महिलांवर याचा खोलवर परिणाम होतो, कारण त्यांचे मेंदू अधिक जटिल आणि सक्रिय असतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महिलांना दररोज किमान 7 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे मन आणि शरीर पूर्णपणे बरे होण्यास मदत मिळते. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य एवढ्या तासांची झोप आवश्यक आहे. चांगली झोप महिलांना तणावाशी लढण्यास मदत करते आणि त्यांचे एकूण आरोग्य सुधारण्यास फायदा होतो. या अभ्यासातून हे स्पष्ट होते की महिलांच्या झोपेच्या गरजा पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात आणि हे लक्षात घेऊन, त्यांना त्यांच्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून त्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते.