Worlds First Museum | जगातील पहिले वस्तुसंग्रहालय कोणते?

Worlds First Museum |
Worlds First Museum | जगातील पहिले वस्तुसंग्रहालय कोणते?anshar73
Published on
Updated on

लंडन : इतिहास, कला आणि प्राचीन संस्कृतीचे जतन करण्यासाठी ‘म्युझियम’ म्हणजेच वस्तूसंग्रहालये महत्त्वाची भूमिका बजावतात. आज जगात लाखो म्युझियम्स आहेत, पण ‘जगातील सर्वात पहिले वस्तूसंग्रहालय कोणते?‘ असा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा इतिहासकार याचे उत्तर दोन वेगवेगळ्या द़ृष्टिकोनातून देतात.

प्राचीन काळातील खासगी संग्रह आणि आधुनिक काळातील लोकांसाठी खुले झालेले सार्वजनिक संग्रहालय, या दोन्हीचा इतिहास थक्क करणारा आहे. याबद्दलची सविस्तर माहिती अशी : 1. मानवी इतिहासातील सर्वात पहिले संग्रहालय: ‘एनिगाल्डी-नान्ना म्युझियम’ (इसवी सन पूर्व 530)ः इतिहासकारांच्या मते, जगातील सर्वात जुने आणि पहिले वस्तूसंग्रहालय आजपासून सुमारे 2,500 वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 530 मध्ये स्थापन झाले होते. हे संग्रहालय ‘एनिगाल्डी-नान्ना म्युझियम’ म्हणून ओळखले जाते. हे संग्रहालय प्राचीन ‘उर’ शहरात होते, जे सध्याच्या इराक देशामध्ये येते. न्यू-बॅबिलोनियन साम्राज्याचे शेवटचे राजे ‘नाबोनिडस’ यांच्या कन्या राजकुमारी एनिगाल्डी-नान्ना यांनी या संग्रहालयाची स्थापना केली होती. तिचे वडील स्वतः इतिहासाचे अभ्यासक आणि आद्य पुरातत्त्वशास्त्रज्ञ मानले जातात.

सन 1925 मध्ये ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञ लिओनार्ड वूली यांनी उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लावला. येथे मेसोपोटेमिया संस्कृतीतील प्राचीन वस्तू, हजारो वर्षांपूर्वीचे पुतळे आणि मातीचे शिक्के अतिशय पद्धतशीरपणे मांडून ठेवले होते. विशेष म्हणजे, या वस्तूंची माहिती देण्यासाठी तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये मातीच्या विटांवर त्याचे वर्णन (लेबल्स) लिहिले होते. 2. सर्वसामान्यांसाठी खुले झालेले जगातील पहिले ‘सार्वजनिक’ संग्रहालय : कॅपिटोलिन म्युझियम (1471) जर आधुनिक काळातील, म्हणजेच सर्वसामान्य जनतेला प्रवेश असणार्‍या जगातील पहिल्या सार्वजनिक संग्रहालयाचा विचार केला, तर ते मान मिळतो इटलीतील संग्रहालयाला. त्याचे नाव कॅपिटोलिन म्युझियम. हे इटलीच्या रोम शहरात सुरू करण्यात आले. या संग्रहालयाची सुरुवात सन 1471 मध्ये झाली, जेव्हा पोप सिक्स्टस चौथे यांनी रोममधील जनतेला काही ऐतिहासिक आणि मौल्यवान कांस्य पुतळे भेट म्हणून दिले. पुढे सन 1734 मध्ये हे संग्रहालय अधिकृतपणे सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले. कोणत्याही भेदभावविना जगातील सामान्य माणसाला कलेचा आनंद घेता यावा, या उद्देशाने डिझाईन केलेले हे जगातील पहिले संग्रहालय ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news