Top Mushroom Producing Country | मशरूम उत्पादनात कोणता देश आहे जगात अव्वल?

Top Mushroom Producing Country |
Top Mushroom Producing Country | मशरूम उत्पादनात कोणता देश आहे जगात अव्वल?
Published on: 
Updated on: 

बीजिंग : गेल्या दशकभरात खाण्यापिण्यात मशरूम्सचा वापर वाढला आहे. जगभरात मशरूम्सच्या १४ हजार जाती आहेत; पण प्रत्येक मशरूम हा खाण्यास योग्य नसतो. त्यापैकी काही प्रकारच खाण्यास सुरक्षित असतात. ते पौष्टिक असते आणि त्याने पोषणही होते. जगातले काही देश हे मशरूम्सच्या शेतीत आघाडीवर आहेत. त्यात सर्वात पहिला नंबर लागतो तो चीनचा. चीनमध्ये मशरूम्सचे इतके प्रचंड उत्पादन होते की, दुसरा कोणताही देश त्याच्या आजूबाजूलाही भटकू शकत नाही. त्यानंतर जपान, भारत आणि अमेरिकेचा या यादीत नंबर लागतो.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्‍न आणि कृषी संघटनेच्या (FAO) FAOSTAT डेटाबेसमधील २०२४ सालच्या आकड्यांनुसार, जगात मशरूम्स आणि ट्रफलचे एकूण उत्पादन सुमारे ५.१६ कोटी टन होते. त्यामध्ये एकट्या चीनचा वाटा सुमारे ४.८६ कोटी टन, म्हणजेच जवळपास ९४.२ टक्के इतका आहे. तर, ४.९४ लाख टन उत्पादनासह (१ टक्का) जपानचा या यादीत दुसरा नंबर आहे. ३.४७ लाख टनांसह भारत तिसऱ्या स्थानी आणि २.९९ लाख टन या आकड्यासह अमेरिकेचा या यादीत चौथा नंबर आहे. यानंतर पोलंड, नेदरलंड, स्पेन आणि कॅनडा या देशांचाही नंबर लागतो. CEFA या चीनमधील संस्थेच्या आकडेवारीनुसार, २०२३ साली चीनमध्ये खाण्यायोग्य मशरूमचे उत्पादन ४.३३४ कोटी टन होते आणि त्याचे मूल्य ३९६.५६ अब्ज युआन इतके होते.

वर्ष आणि गणनेच्या पद्धतीतील फरकामुळे या आकडेवारीत तफावत दिसते. मात्र, दोन्ही आकडेवारींतून मशरूम उत्पादनातील चीनचे वर्चस्व स्पष्ट होते. CEFA नुसार, जागतिक उत्पादनात चीनचा वाटा ९२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जपानच्या कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२१ साली जपानमध्ये मशरूमचे उत्पादन सुमारे ४.६२ लाख टन इतके झाले. गेल्या काही वर्षांपासून हे उत्पादन जवळपास याच पातळीवर स्थिर आहे. जपानमध्ये ताज्या शिताके मशरूमला सर्वाधिक किंमत मिळते. त्यानंतर बूना-शिमेजी आणि माईताके या मशरूमच्या जातींचा क्रमांक लागतो. तर, अमेरिकेत पांढऱ्या रंगाच्या बटन मशरूमची सर्वाधिक प्रमाणात लागवड केली जाते. USDA-NASS च्या आकडेवारीनुसार, पेनसिल्व्हेनिया हे अमेरिकेतील सर्वाधिक मशरूम उत्पादन करणारे राज्य आहे. चीनमध्ये मशरूमच्या १ हजाराहून अधिक प्रजाती आढळतात. शिताके, ऑयस्टर, एनोकी, वुड इअर आणि बटन मशरूम यासारख्या अनेक जातींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. काही आकडेवारीनुसार, जागतिक शिताके उत्पादनात चीनचा वाटा जवळपास ९८ टक्के आहे.