

लंडन : समुद्राच्या खोलवर राहणारे महाकाय व्हेल मासे त्यांच्या प्रचंड आकारामुळे आणि खाण्याच्या सवयींमुळे ओळखले जातात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, एक व्हेल एका दिवसात किती अन्न खाऊ शकते? शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की व्हेल दररोज जेवढे अन्न खातात, त्याची मात्रा इतर कोणत्याही जीवापेक्षा खूप जास्त असते. संशोधनानुसार, एक प्रौढ व्हेल दररोज 1 ते 4 टन (टन म्हणजे 1000 किलो) पर्यंत अन्न खाऊ शकते. ही मात्रा तिची प्रजाती, आकार, वय आणि हवामानानुसार बदलत राहते.
व्हेलची सर्वात मोठी प्रजाती म्हणजे ब्ल्यू व्हेल (निळा देवमासा), जी पृथ्वीवरील सर्वात मोठी सजीव प्रजाती मानली जाते. हा व्हेल दररोज सुमारे 3 ते 4 टन क्रिल म्हणजेच लहान कोळंबी माशांसारखे जीव खातो. एका अंदाजानुसार, ही मात्रा सुमारे चार कोटी क्रिल एवढी असते. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की पूर्व उत्तर पॅसिफिक महासागरात एक ब्ल्यू व्हेल एका दिवसात 10 ते 20 टन पर्यंत अन्न खाऊ शकतो. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांच्या मते, या अन्नाची मात्रा सुमारे 20 ते 50 दशलक्ष कॅलरी इतकी असते. ब्ल्यू व्हेलच्या जेवण करण्याची पद्धत खूप मनोरंजक आहे : ती आपले प्रचंड तोंड उघडून पाण्याचा एक मोठा भाग गिळते.
त्यानंतर, बलीन प्लेटस् नावाच्या संरचनेच्या मदतीने ती पाणी बाहेर काढते आणि फक्त क्रिल आत ठेवते. हंपबॅक व्हेल आणि फिन व्हेल यांसारख्या इतर व्हेल प्रजाती प्रामुख्याने लहान मासे, क्रिल आणि प्लवक खातात. तर ओर्का किंवा किलर व्हेल यांसारख्या प्रजाती शिकारी स्वभावाच्या असतात आणि त्या मासे, सील आणि इतर समुद्री सस्तन प्राण्यांची शिकार करतात. संशोधकांचे असे मत आहे की, ब्ल्यू, फिन, मिंक आणि हंपबॅक व्हेल यांसारख्या बलीन व्हेल पूर्वीच्या अंदाजांपेक्षा सरासरी दरवर्षी सुमारे तिप्पट जास्त अन्न खातात.