

लंडन : सोन्याची किंमत अफाट आहे; पण त्याचा जन्म पृथ्वीच्या मातीत झाला नाही, हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल. सोनं आणि प्लॅटिनमसारख्या भारी धातू अंतराळातील प्रचंड ऊर्जेच्या घटनांमध्ये तयार होतात. पृथ्वी तयार होताना तिच्या गर्भात सोनं नव्हतं. ते नंतर बाहेरून आलं, असे वैज्ञानिक संशोधक सांगतात. हे सत्य समजल्यावर सोन्याकडे पाहण्याचा द़ृष्टिकोनच बदलतो.
आधी शास्त्रज्ञांचं मत होतं की, सोनं फक्त न्यूट्रॉन स्टार्स म्हणजे अतिशय घन द्रव्याच्या तार्यांच्या जोरदार टक्करांमधून तयार होतं. अशा टक्करीला ‘किलोनोवा’ म्हणतात. ही घटना अतिशय दुर्मीळ असते; पण जेव्हा होते तेव्हा प्रचंड प्रमाणात सोनं आणि इतर मौल्यवान धातू तयार होतात. हे सोनं अंतराळात विखुरलं जातं. अलीकडील संशोधनाने एक नवं रहस्य उघड केलं आहे. मॅग्नेटार्स नावाच्या तार्यांमधूनही सोनं तयार होऊ शकतं. हे मॅग्नेटार्स न्यूट्रॉन स्टार्सचेच एक प्रकार आहेत; पण त्यांचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापेक्षा अब्जावधी पट जास्त शक्तिशाली असतं. त्यांच्या स्फोटांमुळे भारी धातू तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते, असे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
सोनं तयार होण्याची पद्धत ‘रॅपिड न्यूट्रॉन कॅप्चर’ किंवा ‘आर-प्रोसेस’ म्हणून ओळखली जाते. यात अणू अतिशय वेगाने न्यूट्रॉन शोषून घेतात आणि भारी धातूत रूपांतरित होतात. 2004 मध्ये झालेल्या गॅमा किरणांच्या स्फोटाच्या अभ्यासातून याचा पुरावा मिळाला. या स्फोटातून मॅग्नेटार्स सोनं तयार करू शकतात, हे स्पष्ट झालं. अंदाजे 400 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर प्रचंड उल्कापिंडांचा वर्षाव झाला होता. या उल्का अंतराळातील सोनं घेऊन आल्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते साठवलं गेलं. पृथ्वी तयार होताना भारी धातू केंद्राकडे गेल्या होत्या, त्यामुळे वरच्या भागात सोनं उल्कांमधूनच आलं.
यामुळे आज आपल्याला सोन्याची खाणी आणि सोन्याचे साठे मिळाले आहेत. सोनं दुर्मीळ आहे. कारण, त्याच्या निर्मितीसाठी लागणार्या घटना अतिशय दुर्मीळ असतात. न्यूट्रॉन स्टार्सची टक्कर लाखो वर्षांत एकदाच होते, तर मॅग्नेटार्सचे स्फोटही मर्यादित प्रमाणातच होतात. एका सेकंदात सूर्याच्या लाखो वर्षांच्या ऊर्जेच्या बरोबरीचे स्फोट होतात; पण ते इतके विरळ आहेत की, सोनं जगभरात फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे सोनं इतकं मौल्यवान झालं आहे.