Cancer taste experiment | जेव्हा कॅन्सरची चव घेणे डॉक्टरांच्या जीवावर बेतले

17 व्या शतकातील सॅम्युअल स्मिथ यांच्या एका भयानक प्रयोगाची जीवघेणी कहाणी
Cancer taste experiment |
Cancer taste experiment | जेव्हा कॅन्सरची चव घेणे डॉक्टरांच्या जीवावर बेतले
Published on
Updated on

लंडन : 17 व्या शतकात जेव्हा विज्ञानाचा विकास होत होता, तेव्हा रोगांची कारणे शोधण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रयोग करत असत. असाच एक अंगावर काटा आणणारा प्रयोग लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलचे प्रसिद्ध सर्जन सॅम्युअल स्मिथ यांनी केला होता, ज्याचा शेवट त्यांच्या मृत्यूने झाला.

17 व्या शतकाच्या पूर्वार्धात, सॅम्युअल स्मिथ यांनी एका महिलेच्या स्तनावर कर्करोगाची (बे्रस्ट कॅन्सर) शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर, कर्करोगाच्या गाठीमध्ये असलेला द्रव किंवा रस नेमका कसा असतो, हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता वाटली. त्यांनी आपल्या बोटाने त्यातील थोडा द्रव घेतला आणि तो चक्क आपल्या जिभेने चाखून पाहिला.

स्मिथ यांनी तो द्रव जिभेला लावताच त्यांना एखाद्या तीव्र अ‍ॅसिडसारखा (जसे की सल्फ्यूरिक अ‍ॅसिड) झटका बसला. तो चटका जिभेवरून थेट घशापर्यंत गेला. त्यांनी तातडीने गुळण्या केल्या आणि भरपूर मद्य (वाईन) प्राशन केले, जेणेकरून ती चव निघून जावी. मात्र, ती विचित्र आणि भयानक चव त्यांच्या जिभेवरून कधीच गेली नाही. उत्तम प्रकृती असलेले स्मिथ या प्रयोगामुळे हळूहळू खंगत गेले. त्यांच्या मृत्युशय्येवर त्यांनी कबूल केले की, त्या कर्करोगाच्या चवीनेच त्यांचा बळी घेतला आहे. त्यांच्या मृत्यूपर्यंत ती चव त्यांच्या जिभेत कायम होती.

विज्ञानाचा विष सिद्धांत आणि मानवी भावना

त्या काळातील संशोधक असे मानत की, कॅन्सर हा शरीरातील एका विषारी घटकामुळे होतो. मात्र, स्मिथ यांच्या बाबतीत वैज्ञानिकांचे असे मत आहे की, कर्करोगाच्या त्या द्रवपदार्थाच्या अत्यंत घाणेरड्या वासामुळे आणि चवीमुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर इतका खोलवर परिणाम झाला की, त्यांचे शरीर खंगत गेले. 17 व्या आणि 18 व्या शतकात असे मानले जाई की, केवळ कर्करोगाच्या जखमांकडे पाहिल्याने किंवा त्यांचा वास घेतल्यानेही रोग होऊ शकतो. यामुळेच कर्करोगाच्या रुग्णांना रुग्णालयात प्रवेश नाकारला जात असे आणि त्यांना घरात लपवून ठेवले जाई.

1711 मध्ये विल्यम बेकेट नावाच्या दुसर्‍या एका सर्जनने स्मिथ यांची कथा ऐकल्यावर स्वतःही तसाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तो द्रव चवीला अतिशय घाणेरडा वाटला; पण स्मिथ यांच्यासारखा प्राणघातक चटका त्यांना बसला नाही. यामुळे कॅन्सर संसर्गजन्य आहे की नाही, यावर दोनशे वर्षे वाद सुरू होता. 19 व्या शतकापर्यंत अशा संवेदनात्मक (सेन्सोरी) सिद्धांतांवर विश्वास ठेवला जात होता. मात्र, 1890 मध्ये रेडिओथेरपी आणि 1940 मध्ये केमोथेरपीचा शोध लागल्यानंतर कॅन्सरबद्दलचे हे गैरसमज दूर झाले. सॅम्युअल स्मिथ यांचा हा प्रयोग आजही वैद्यकीय इतिहासातील एक भीतिदायक; पण महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news