

लंडन : आज आपल्याला सार्वजनिक शौचालये ही एक सामान्य सुविधा वाटते; परंतु एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण जगासाठी हे एक मोठे आश्चर्य होते. एकेकाळी रस्त्यांवर सार्वजनिक शौचालये नसायची, ज्यामुळे विशेषतः महिलांना आणि स्वच्छतेच्या द़ृष्टीने मोठी गैरसोय व्हायची. मात्र, एका प्लंबरच्या दूरद़ृष्टीमुळे हे चित्र बदलले. 2 फेब्रुवारी हा दिवस स्वच्छतेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला.
सार्वजनिक स्वच्छतेच्या दिशेने हे ऐतिहासिक पाऊल जॉर्ज जेनिंग्स यांनी उचलले होते. जेनिंग्स हे पेशाने प्लंबर आणि सॅनिटरी इंजिनिअर होते. 1851 च्या लंडनमधील ‘ग्रेट एक्झिबिशन’मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकांना ‘फ्लश टॉयलेट’ची ओळख करून दिली. त्यांचा हा प्रयोग इतका यशस्वी झाला की, सुमारे 8.27 लाख लोकांनी प्रत्येकी ‘एक पेनी’ देऊन या सुविधेचा वापर केला. विशेष म्हणजे, त्याकाळी एक पेनीच्या मोबदल्यात केवळ शौचालयच नाही, तर स्वच्छ सीट, टॉवेल, कंगवा आणि बूट पॉलिश यांसारख्या प्रीमियम सुविधाही देण्यात आल्या होत्या. प्रदर्शनातील यशानंतर, 2 फेब्रुवारी 1852 रोजी लंडनच्या रस्त्यांवर सर्वसामान्यांसाठी कायमस्वरूपी ‘पब्लिक फ्लशिंग टॉयलेटस्’ सुरू करण्यात आले. त्याकाळी यांना ‘पब्लिक वेटिंग रूम्स’ म्हटले जाई. पुरुषांसाठी पहिले शौचालय ‘95 फ्लीट स्ट्रीट’ येथे सुरू झाले.
काही दिवसांनंतर ‘51 बेडफोर्ड स्ट्रीट’ येथे महिलांसाठी ही सुविधा देण्यात आली. येथे प्रवेशासाठी 2 पेनी शुल्क आकारले जाई, तर हात धुणे किंवा ब्रश करणे यांसारख्या सेवांसाठी वेगळे शुल्क होते. व्हिक्टोरियन युगात लंडनची स्थिती आजच्यासारखी नव्हती. शहरातील सर्व सांडपाणी थेट थेम्स नदीत सोडले जाई. यामुळे 1858 मध्ये शहरात इतकी भयानक दुर्गंधी पसरली की, त्या घटनेला ‘ग्रेट स्टिंक’ म्हणून ओळखले जाते. या संकटामुळे सरकारला स्वच्छतेबाबत कठोर पावले उचलणे भाग पडले. या दुर्गंधीच्या संकटावर मात करण्यासाठी इंजिनिअर जोसेफ बेजलजेट यांनी आधुनिक ‘अंडरग्राऊंड सीवर सिस्टम’ (भूमिगत सांडपाणी व्यवस्था) निर्माण केली. या प्रणालीमुळे शहरातील घाण दूर नेणे शक्य झाले आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवता आले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जोसेफ यांनी दीडशे वर्षांपूर्वी बनवलेली ही यंत्रणा आजही लंडनमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे. जॉर्ज जेनिंग्स यांचे फ्लश टॉयलेट आणि जोसेफ बेजलजेट यांची सीवर सिस्टम, या दोघांच्या योगदानामुळे केवळ लंडनचा चेहरामोहरा बदलला नाही, तर संपूर्ण जगाला सार्वजनिक स्वच्छतेचे एक आधुनिक मॉडेल मिळाले.