

वॉशिंग्टन : दक्षिण ध्रुवावर पसरलेली अंटार्क्टिकाची विशाल पांढरी चादर आज आपल्याला एकसंध वाटत असली, तरी पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे हा भूभाग वेगाने बदलत आहे. विशेषतः, पश्चिम अंटार्क्टिकाचा बर्फ अत्यंत वेगाने वितळून समुद्राला मिळत आहे. यामुळे केवळ समुद्राची पातळी वाढून मानवी वस्त्या धोक्यात येतील असे नाही, तर खुद्द अंटार्क्टिका खंडाचे स्वरूपही पूर्णपणे बदलणार आहे.
सुमारे 53 लाख ते 26 लाख वर्षांपूर्वीच्या ‘प्लायोसिन कालखंडात’ पृथ्वीचे तापमान आजच्या सारखेच वाढले होते. संशोधकांना समुद्राच्या तळाशी असलेल्या गाळाच्या थरांमध्ये असे पुरावे सापडले आहेत की, त्या काळात पश्चिम अंटार्क्टिकावरील बर्फाचा थर मोठ्या प्रमाणावर वितळला होता. तेव्हा संपूर्ण खंड बर्फाच्छादित राहण्याऐवजी केवळ डोंगरांच्या शिखरांवरच हिमनद्या उरल्या होत्या. 2019 मध्ये ‘इंटरनॅशनल ओशन डिस्कव्हरी प्रोग्राम’ ( Expedition 379) अंतर्गत शास्त्रज्ञांनी अमंडसेन समुद्रात एक मोठी मोहीम राबवली.
‘जॉयडस् रिझोल्यूशन’ नावाच्या जहाजावरून समुद्राच्या तळाशी सुमारे 13,000 फूट खोल ड्रिलिंग करण्यात आले. यातून बाहेर काढलेल्या गाळाच्या नमुन्यांचा अभ्यास केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशोधकांच्या मते, जेव्हा पश्चिम अंटार्क्टिकाचा बर्फ वितळतो, तेव्हा त्या भागातील भूगर्भीय हालचालींमध्ये मोठी वाढ होते. कन्व्हेयर बेल्टप्रमाणे हालचाल : हिमनद्या जमिनीवरून सरकताना सोबत खडक आणि माती वाहून नेतात. जेव्हा बर्फ वितळतो, तेव्हा हे ओझे समुद्राच्या तळाशी जमा होते.
जमिनीची पुनर्रचना : लाखो टन बर्फाचा दाब कमी झाल्यामुळे अंटार्क्टिकाची जमीन वर उचलली जाण्याची किंवा तिथे भूकंप आणि ज्वालामुखी सक्रिय होण्याची शक्यता असते. आजची परिस्थिती 30 लाख वर्षांपूर्वीच्या त्या उष्ण कालखंडाशी मिळतीजुळती आहे. शास्त्रज्ञांनी जमा केलेले हे पुरावे सूचित करतात की, अंटार्क्टिकाचा बर्फ केवळ पाणी होऊन वाहत नाहीये, तर तो या संपूर्ण खंडाची रचना बदलत आहे. हा बदल येणार्या काळात किनारपट्टीवरील देशांसाठी आणि जागतिक पर्यावरणासाठी अत्यंत गंभीर ठरू शकतो.