

वॉशिंग्टन : 19 व्या शतकात स्नेक ऑईल (सापाचे तेल) हे अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये एक अत्यंत लोकप्रिय घरगुती औषध मानले जात होते. मात्र, कालांतराने हेच नाव बनावटगिरी आणि फसवणुकीचे प्रतीक बनले. एका लोकसाहित्यातील जालीम उपायाचा बनावट औषध म्हणून झालेला प्रवास थक्क करणारा आहे.
स्नेक ऑईल म्हणजे काय?
सापांच्या शरीरात नैसर्गिकरित्या तेल नसते, परंतु सापाची चरबी संकलित करून ती मंद आचेवर गरम केल्यास त्यापासून एक द्रव तयार होतो. 1896 च्या अहवालानुसार, एका सापापासून साधारण 2 ते 3 औंस तेल निघत असे. हे तेल प्रामुख्याने सांधेदुखी, स्नायू ताणणे आणि शरीरातील विविध वेदनांवर रामबाण उपाय मानले जात असे.
लोकप्रियता आणि व्यवसाय
20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या तेलाचा प्रचंड प्रभाव होता. ओक्लाहोमा येथील लॉरा मसाल सारख्या स्नेक हंटर्स सापांची शिकार करून त्यापासून तेल तयार करत असत. रॅटलस्नेक किंग म्हणून ओळखल्या जाणार्या क्लार्क स्टॅनलेने तर या व्यवसायाचे मोठे साम्राज्य उभे केले होते. अवघ्या 50 सेंटस्ला मिळणारे त्याचे स्नेक ऑईल लिनिमेंट हाडांपर्यंत पोहोचून वेदना दूर करते, असा त्याचा दावा होता. अमेरिकेत अनेक ठिकाणी रॅटलस्नेक फार्म्स (साप पाळण्याची केंद्रे) देखील सुरू झाली होती.
कायद्याचा बडगा आणि शेवट
स्नेक ऑईलचा शेवट 1906 च्या प्युअर फूड अँड ड्रग अॅक्टमुळे झाला. सरकारी तपासणीत असे धक्कादायक वास्तव समोर आले की, ज्याला स्नेक ऑईल म्हणून विकले जात होते, त्यात सापाच्या तेलाचा अंश अत्यंत कमी किंवा शून्य होता.1915 मध्ये क्लार्क स्टॅनलेच्या औषधाची प्रयोगशाळेत चाचणी केली असता, त्यात मुख्यत्वे खनिज तेल (मिनरल आईल), 1 टक्का गोमांसाची चरबी, लाल मिरचीचा अर्क (कॅप्सिकम) आणि कापूर असल्याचे आढळले. स्टॅनलेला या फसवणुकीबद्दल 20 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. सरकारी कारवाई आणि वैज्ञानिक पुराव्यांमुळे या तेलाची विश्वासार्हता पूर्णपणे संपली. आज इंग्रजी भाषेत स्नेक ऑईल सेल्समन हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जो लोकांना खोट्या आश्वासनांनी बनावट वस्तू विकतो. अशा प्रकारे, एका पारंपरिक औषधाचे रूपांतर फसवणुकीच्या जागतिक प्रतीकात झाले.