

नवी दिल्ली ः रक्तप्रवाहामुळे मोठ्या रक्तवाहिन्यांवर येणारा दाब रक्तदाबाच्या स्वरूपात मोजला जातो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. धमनींच्या होणार्या नुकसानापासून ते हार्ट फेल्युअरपर्यंत त्याचे परिणाम गंभीर आढळून येतात. जेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताचा दाब खूप जास्त असतो तेव्हा त्यास उच्च रक्तदाब म्हणून ओळखले जाते. या स्थितीमुळे हृदयाला संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. कालांतराने हृदय आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. ज्यामुळे उच्च रक्तदाब हा हृदयरोग आणि स्ट्रोकच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरतो आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
हल्ली उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढली असून अनुवंशिकता, कौटुंबिक इतिहास, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव, लठ्ठपणा, धूम—पान, खाण्याच्या चुकीच्या सवयी, वय, हार्मोनल असंतुलन किंवा मूत्रपिंडाचा आजार असे घटक यास कारणीभूत ठरतात. उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दिसून येत नाहीत म्हणूनच अनेक लोकांना त्यासंबंधी गुंतागुंत निर्माण होईपर्यंत त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे हे कळून येत नाही. काही प्रकरणांमध्ये डोकेदुखी, दम लागणे, छातीत अस्वस्थता किंवा द़ृष्टी दोष आढळून येऊ शकतो. ही लक्षणे तेव्हाच दिसून येतात जेव्हा रक्तदाब धोकादायक पातळीवर पोहोचतो किंवा अवयवांना नुकसान पोहोचवू लागतो.
उच्च रक्तदाब हृदयाचे अनेक प्रकारे नुकसान करू शकते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने तसेच त्यांची लवचिकता कमी झाल्याने त्यांना हानी पोहोचते ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो, ही स्थिती कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखली जाते. यामुळे छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो. त्याचप्रमाणे हृदयाचा कडकपणा किंवा अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, तसेच रक्तवाहिनी त्यानुसार आकार बदलू लागते. एखाद्याला हार्ट फेल्युअर आणि अचानक हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो. उच्च रक्तदाब अनेकदा रक्तातील साखरेची उच्च पातळी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या आरोग्य समस्यांसह आढळून येते, ज्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम नावाची स्थिती उद्भवते. यामुळे स्ट्रोक आणि मधुमेहाची शक्यता वाढते. म्हणून उच्च रक्तदाबाचे व्यवस्थापन करणे आणि हृदयाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. काही ठराविक गोष्टी उच्च रक्तदाब रोखण्यास किंवा ते नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. जसे की संतुलित जीवनशैली बाळगणे, ताजी फळे आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे, आहारातील मिठाचे सेवन मर्यादित करणे आणि शारीरिकद़ृष्ट्या सक्रिय राहणे गरजेचे आहे. वजन नियंत्रित राखणे, तंबाखू आणि मद्यपानाचे व्यसन सोडणे तसेच योग आणि ध्यानधारणेच्या मदतीने ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यास मदत होईल.