

लंडन : डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि वैमानिकांचा कॉकपिटमधील आवाज (CVR) रेकॉर्ड करणारं उपकरण याला सामान्य भाषेत ‘ब्लॅक बॉक्स’ म्हटलं जातं. विमानाच्या उड्डाणापासून ते लँड होईपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा या ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये स्टोअर केला जातो. विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घ्त झालं, तर ब्लॅक बॉक्सच्या मदतीने तपास अधिकार्यांना विमानाचा प्रवास, अपघातासाठी काही तांत्रिक कारणे जबाबदार आहेत का? नक्की काय घडलं होतं, याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ब्लॅक बॉक्स एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. विमान दुर्घटनेनंतर शेपटीला कमी मार लागतो म्हणून ब्लॅक बॉक्स शेपटीच्या बाजूला बसवण्यात येतो. विमानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला हा ब्लॅक बॉक्स खरं तर काळ्या रंगाचा नसतो. हा ब्लॅक बॉक्स केशरी रंगाचा असतो. जेणेकरून विमान अपघातानंतर सहजतेने तपास अधिकार्यांना ओळखता यावा. एखाद्या बूट ठेवण्याच्या बॉक्सच्या आकाराचा हा ब्लॅक बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्सच्या आतील भागात थर्मल ब्लॉक असतो. यात मेमरी बोर्ड ठेवण्यात आलेले असतात. विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये विमानाची संपूर्ण माहिती स्टोअर केली जाते.
ब्लॅक बॉक्सचे दोन महत्त्वाचे भाग असतात : 1) फ्लाईट डेटा रेकॉर्डर 2) कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाची तांत्रिक माहिती स्टोअर केली जाते. उदाहरणार्थ, हवामान, विमानाचा वेग, इंधनसाठा, ऑटो-पायलट स्टेटस, विमानाची उंची आणि दिशा याची माहिती यात स्टोअर करण्यात येते. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये कॉकपिटमधील संभाषण रेकॉर्ड केले जाते.
ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा, यासाठी तो स्टिल किंवा टायटेनियमचा बनवण्यात आलेला असतो. एक तासापर्यंत 1000 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानात ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. समुद्राचं खारं पाणी किंवा इतर ठिकाणी 6000 मीटर्स खोलीपर्यंत हा सुरक्षित राहतो. विमान समुद्रात क्रॅश झालं असेल, तर ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी यावर एक बिकन किंवा सिग्नल असतो. हा अल्ट्रासाऊंड सिग्नल अपघातानंतर 30 ते 90 दिवसापर्यंत सिग्नल पाठवतो. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, संशोधक डेव्हिड वॉरेन यांनी सर्वप्रथम ब्लॅक बॉक्सचा शोध लावला. वॉरेन ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या एरोनॉटीकल रिसर्च लॅबमध्ये संशोधक होते. 1950 च्या मध्यात एका विमान अपघाताचा डेव्हिड वॉरेन तपास करत होते. त्यावेळी विमानात दुर्घटनेआधी नक्की काय झालं होतं, याची माहिती मिळाली, तर अधिक चांगलं होईल, अशी कल्पना सुचल्यानंतर त्यांनी संशोधन सुरू केलं. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिला ब्लॅक बॉक्स विमानात बसवण्यात आला. भारतात 2005 पासून सर्व विमानांमध्ये ब्लॅक बॉक्सअनिवार्य करण्यात आले.