

नवी दिल्ली : ‘स्थावराणां हिमालयः’ म्हणजे सर्व स्थिर पदार्थांमध्ये हिमालय ही माझी विभुती आहे, असे भगवंतांनी गीतेच्या दहाव्या अध्यायात सांगितले आहे. हिमालय हा भारतासाठी एक सामान्य पर्वतराजी नाही, तर आपल्या हवामान, नद्या, शेती आणि जैवविविधतेचा आधारस्तंभ आहे. यालाच पृथ्वीचं छत म्हणतात, कारण हा जगातला सर्वात उंच पर्वत आहे. उत्तर भारताचं हवामान समतोल ठेवण्यात हिमालयाची खूप मोठी भूमिका आहे, पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की जर हिमालय आपल्या जागेवरून हलला किंवा अस्तित्वातच राहिला नाही, तर काय होईल? याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात!
हिमालय उत्तरेकडून येणार्या थंड, बर्फाळ वार्यांना अडवतो. जर तो नसता, तर हे वारे थेट भारतात शिरले असते आणि उत्तर भारत बर्फात गाडला गेला असता. इतकी थंडी वाढली असती की सामान्य जीवन जगणंही अवघड झालं असतं. पिकं उगम पावायला हवामान अनुकूल राहिलं नसतं, त्यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात आली असती. हिमालय पावसाळी वार्यांना अडवून त्यांना भारतात वळवतो. त्यामुळे देशात चांगला पाऊस पडतो, पण जर हिमालय नसेल, तर पावसाचं प्रमाण कमी होईल किंवा अनियमित होईल.
यामुळे काही भागात दुष्काळ तर काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता वाढेल. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र यांसारख्या मोठ्या नद्या हिमालयातील बर्फ वितळून निर्माण होतात. जर हिमालय नसेल, तर या नद्यांमध्ये पाणीच राहणार नाही. याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर, शेतीसाठीच्या सिंचनावर आणि विजेच्या निर्मितीवर होईल. देशात पाणीटंचाई निर्माण होईल आणि शेतकर्यांचे हाल होतील. हिमालयात अनेक दुर्मीळ प्राणी आणि वनस्पती आढळतात. जर हे डोंगरच राहिले नाहीत, तर ही सगळी जैवविविधता नष्ट होईल.
यामुळे पर्यावरणाची साखळी विस्कळीत होईल आणि निसर्गात असंतुलन निर्माण होईल. हिमालय ज्या जागेवर आहे, तिथे भूगर्भात प्लेटस् एकमेकांवर ढकलल्या जातात. हिमालय त्याचा काही प्रमाणात तोल सांभाळतो. जर तो नसेल, तर भूकंपांचं प्रमाण वाढेल. शिवाय, हिमालय उत्तर भारताच्या सीमेवर नैसर्गिक संरक्षण देतो. तो नसेल, तर देशाच्या सीमावर्ती सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.