

वॉशिंग्टन : 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी एका भयावह दिवशी पृथ्वीला अवघ्या 15 किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने धडक दिली. सध्याच्या मेक्सिकोच्या भागात ही धडक झाली. त्यामुळे पृथ्वीवर 16 कोटी 50 लाख वर्षांपासून राहत असलेल्या विविध प्रजातींच्या डायनासोरचा विनाश झाला. धडकेनंतर मोठ्या त्सुनामी उसळल्या, जंगलात वणवे लागले, ज्वालामुखींचे उद्रेक झाले आणि आम्लयुक्त पाऊस पडू लागला. या सर्वांचा परिणाम म्हणजे डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले. त्यावेळी डायनासोरसह पृथ्वीवरील 75 टक्के प्रजाती नष्ट झाल्या होत्या. जर असा लघुग्रह पृथ्वीला धडकलाच नसता व डायनासोर नष्ट झाले नसते तर? त्यांचे साम्राज्य असेच पुढे कायम राहिले असते का? ते हिमयुगातही तग धरून राहिले असते का, तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेतही वाढ झाली असती का? या प्रश्नांची उत्तरे रंजक आहेत.
पॅलिओंटोलॉजिस्टनी म्हटले आहे की, जर तशी धडक झाली नसती तर पुढेही डायनासोर विकसित होत राहिले असते आणि त्यांचेच पृथ्वीवर साम्राज्य असते. त्यांनी आधीच तग धरून राहण्याची आपली क्षमता सिद्ध केलेली होती व ते 16 कोटी 50 लाख वर्षांपासून पृथ्वीवर वावरत होते. समुद्राची वाढ व घट, तापमानातील फेरबदल, ज्वालामुखींचे उद्रेक अशा अनेक आपत्तींना त्यांनी आधीही तोंड दिले होते. एडिन्बर्ग युनिव्हर्सिटीतील पॅलिओंटोलॉजिस्ट स्टीव्ह ब्रुसाट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार डायनासोरचे साम्राज्य अबाधित राहिले असते तर आपल्या सस्तन प्राण्यांनी ज्याप्रकारे आपला विकास करून घेतला तसा घडला नसता. त्या काळात पृथ्वीवर सर्वत्र वेगवेगळ्या प्रजातीचे, प्रकारांचे डायनासोर होते. ते मजबूत, यशस्वी आणि जगण्याच्या खेळातील अव्वल खेळाडू ठरलेले होते. मात्र, ते हिमयुगासारख्या खडतर काळातही टिकले असते का? काही डायनासोर प्रजाती या बर्फाळ वातावरणात राहत होत्या. मात्र, बहुतांश डायनासोर प्रजातींना अशा वातावरणाची सवय नव्हती.
ब्रुसाट यांनी सांगितले की, काही प्रजातींना पिसे होती. ते सस्तन प्राण्यांप्रमाणेच थंड वातावरणात राहू शकत होते. टी-रेक्ससारख्या काही प्रजाती तर उष्ण रक्ताच्याही असाव्यात. त्यामुळे ते पूर्णपणे वातावरणाच्या दयेवर अवलंबून होते असे नाही. खडतर वातावरणाचा सामना करण्यासाठी कदाचित त्यांच्यामध्ये नवे बदलही घडले असते. दक्षिण आफ्रिकेत 50 लाख वर्षांपूर्वी विकसित झालेल्या मॅमथ हत्तींचे उदाहरण मोठेच आहे. 8 लाख वर्षांपूर्वीच्या शेवटच्या हिमयुगात मॅमथ हत्ती केसाळ बनले. युरेशियामधील थंड भागात असे ‘वुली मॅमथ’ त्यामुळेच तग धरून राहू शकले. त्यामुळे कदाचित हिमयुगातही काही डायनासोर प्रजाती टिकल्या असत्या. जर पृथ्वीला त्या लघुग्रहाची धडक होऊन डायनासोर नष्ट झाले नसते, तर सस्तन प्राण्यांच्या विकासाला फटका जरूर बसला असता.
डायनासोरच्या काळातही उंदीर, घुशीसारख्या कृदन्त वर्गातील काही सस्तन प्राणी होते. त्यांना आपला विकास करण्याची संधी मिळाली नसती. शिकागो युनिव्हर्सिटीतील पॅलिओंटोलॉजिस्ट पॉल सेरेनो यांच्या म्हणण्यानुसार डायनासोर अस्तित्वात असते तर मानव प्रजाती कधीच विकसित झाली नसती! आजूबाजूला मोठ्या संख्येने विविध प्रजातींचे डायनासोर वावरत असताना ही शक्यता धूसर बनते. एकंदरीत मानवाने व अन्य सस्तन प्राण्यांसाठी लघुग्रहाची ती धडक ‘इष्टापत्ती’च ठरली!