

वॉशिंग्टन : आपल्याकडे स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा तीन प्रकारच्या शरीरांचा उल्लेख आहे. जो डोळ्यांना दिसतो तो (पंचीकृत) पंचमहाभूतांनी बनलेला स्थूल देह. पंचमहाभूतांच्या तसेच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांच्या सुक्ष्मांशाने बनलेला सूक्ष्म देह (हा आपल्याला दिसत नाही) तसेच अज्ञानरूप कारण देह अशा देहांचे वर्णन भारतीय आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आहे. सूक्ष्म देहाने जिवंतपणीही स्थूल देहाच्या बाहेर पडून परत येता येते, असे सांगणारे अनेक योगी आहेत. या देहांना अखंड अशा चेतन आत्मतत्त्वाचे अधिष्ठान असते व त्यामुळेच ते कार्यरत असतात.
स्थूल देहापासून सूक्ष्म देहाचा जोडलेला संबंध तुटणे म्हणजे मृत्यू. त्यावेळी सूक्ष्म देह कायमस्वरूपी स्थूल देहाला सोडून बाहेर जातो, असे म्हटले जाते. जगभरात अशा सूक्ष्म देहाने बाहेर पडून पुन्हा स्थूल देहात आलेल्या लोकांनी काही अनुभव सांगितलेले आहेत. त्याला ‘निअर डेथ एक्सपिरियन्स’ किंवा मृत्यू निकट असताना आलेले अनोखे अनुभव म्हटले जाते. आता त्याबाबत वैज्ञानिक संशोधनही करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या निष्कर्षांवरून संशोधकांमध्येच दोन गट पडले आहेत!
‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, मृत्यूच्या दारातून परत आलेल्या लोकांच्या अनुभवांच्या कारणांबाबत शास्त्रज्ञांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. व्हर्जिनियामध्ये राहणार्या 37 वर्षीय मियाशा गिलियम-एल यांचा अनुभव थक्क करणारा आहे. 2012 मध्ये प्रसूतीनंतर त्यांच्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाले आणि त्यांचे हृदय धडधडणे बंद झाले. मियाशा सांगतात की, त्या क्षणी त्यांनी स्वतःला स्वतःच्या शरीराबाहेर पडताना पाहिले. डॉक्टर त्यांच्या छातीवर दाब देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यानंतर त्यांना एका अंधार्या बोगद्यातून प्रवास केल्याचा आणि अत्यंत शांततेचा अनुभव आला. गेल्यावर्षी बेल्जियम, अमेरिका आणि डेन्मार्कमधील शास्त्रज्ञांच्या पथकाने ‘नेपच्यून’ नावाचे एक मॉडेल सादर केले. या मॉडेलनुसार, जेव्हा हृदय आणि मेंदू थांबतो, तेव्हा रक्तातील ऑक्सिजन कमी होतो आणि कार्बन डायऑक्साईड वाढतो.
यामुळे मेंदूच्या ‘टेम्पोरोपॅरिएटल जंक्शन’ या भागात बिघाड होतो. याच प्रक्रियेमुळे माणसाला आपण शरीराबाहेर आहोत असा भास होतो. मेंदूतील रसायनांच्या बदलामुळे शांतता वाटणे किंवा चमकणारा बोगदा दिसणे या निव्वळ जैविक प्रक्रिया आहेत. व्हर्जिनिया विद्यापीठाचे संशोधक ब्रूस ग्रेसन आणि मारिएटा पेहलिवानोवा यांनी या मॉडेलला आव्हान दिले आहे. त्यांच्या मते, मेंदूतील हालचालींमुळे भास का होतात हे समजू शकते; पण रुग्णांनी शुद्धीवर आल्यावर सांगितलेल्या ‘सत्य’ गोष्टींचे काय? अनेक रुग्णांनी शरीर पूर्णपणे निकामी असतानाही, त्या खोलीत किती लोक होते आणि काय बोलत होते, याची अचूक माहिती दिली आहे, जी विज्ञानाच्या सध्याच्या चौकटीत बसत नाही. 4,000 हून अधिक अशा प्रकरणांचा अभ्यास करणारे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट जेफरी लाँग म्हणतात की, हे अनुभव केवळ मेंदूची कल्पना नसून मानवतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुख्य प्रश्न हा आहे की, शरीराच्या मृत्यूनंतरही आपले अस्तित्व राहते का?