Javed and Altaf Khanani | ‘धुरंधर’मधील खनानी बंधूंचे पुढे काय झाले?
नवी दिल्ली : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील अनेक पात्रांची सर्वत्र चर्चा आहे. ही पात्रे काही खर्या व्यक्तींवर आधारित आहेत. पाकिस्तानातील खनानी बंधूंच्या रूपाने एके काळी भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेली ‘वाळवी’ या चित्रपटाने आता जगासमोर आणली आहे. कराचीतील जावेद आणि अल्ताफ खनानी ही केवळ काल्पनिक पात्रे नसून, ते पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ चे अत्यंत महत्त्वाचे हस्तक होते. बनावट भारतीय नोटा छापून भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा विडा या बंधूंनी उचलला होता. भारतातील नोटबंदीने या रॅकेटचे कंबरडे मोडले होते.
खनानी बंधू इतके खतरनाक होते की, ‘आयएसआय’ त्यांना आपले ‘शॅडो बँकर्स’ (गुप्त बँकर्स) म्हणायचे. हे दोघेही नेपाळ आणि कतारसारख्या देशांच्या माध्यमातून भारतात बनावट नोटा पाठवायचे. बनावट नोटांच्या रॅकेटमधून मिळणारा पैसा ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ सारख्या दहशतवादी संघटनांना पुरवला जात असे. त्यांनी छापलेल्या 500 च्या बनावट नोटा इतक्या हुबेहूब होत्या की, त्यांना पाकिस्तानात ‘सुपर नोट’ म्हटले जाई. सामान्य माणसाला असली आणि नकली नोटेतला फरक ओळखणे अशक्य होते. हे बंधू प्रामुख्याने 50, 100 आणि 500 रुपयांच्या नोटा छापत असत, जेणेकरून त्या बाजारात सहज खपवता येतील.
नेपाळ आणि बांगला देशातील एजंटस्ना 500 ची बनावट नोट अवघ्या 200 रुपयांत मिळत असे. तो एजंट ती नोट भारतात 300 रुपयांत विकायचा. अशा प्रकारे एका नोटेवर एजंटला 100 रुपये तर ती बाजारात खपवणार्या गुन्हेगाराला 200 रुपयांचा नफा मिळायचा. या अफाट नफ्याच्या लालसेपोटी भारतीय गुन्हेगार या धंद्यात ओढले गेले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पीपीपी पक्षाशी त्यांचे जवळचे संबंध होते. याच राजकीय संरक्षणामुळे 2008 मध्ये परवाना रद्द होऊनही 2011 मध्ये त्यांना पुन्हा परवाना मिळाला. त्यांनी दुबईसारख्या ठिकाणी 85 महागड्या मालमत्ता खरेदी केल्या होत्या.
14 ते 16 अब्ज डॉलर्सच्या जागतिक हवाला व्यवसायात (विशेषतः मेक्सिकन ड्रग्ज कार्टेल्ससाठी) सामील असल्याने अमेरिकेची नजर त्यांच्यावर पडली. 2016 मध्ये अमेरिकेने अल्ताफ खनानीला अटक केली आणि त्याला 68 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नोव्हेंबर 2016 मध्ये भारत सरकारने केलेली ‘नोटाबंदी’ या रॅकेटसाठी मृत्युदंडापेक्षा कमी नव्हती. खनानी बंधूंच्या भारतातील तसेच पाकिस्तानमधील तयार केलेल्या नोटा एका रात्रीत रद्दी झाल्या, ज्यामुळे त्यांच्या साम—ाज्याची कंबर मोडली. नोटबंदीच्या अवघ्या 26 दिवसांनंतर, 4 डिसेंबर 2016 रोजी जावेद खनानीचा कराचीतील एका निर्माणाधीन इमारतीवरून पडून मृत्यू झाला. कराची पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे घोषित केले. असे मानले जाते की, नोटाबंदीमुळे झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानामुळे त्याने आत्महत्या केली आणि त्यासोबतच ‘आयएसआय’ च्या बनावट नोटांच्या दहशतीचा अंत झाला.

