

नवी दिल्ली : मंगळावरील राहण्यायोग्यतेत प्राचीन काळात मोठे बदल झाले असून, हे बदल मुख्यत्वे कार्बोनेट खनिजांची निर्मिती आणि तात्पुरत्या ओअॅसिसच्या अस्तित्वामुळे घडले असावेत, असे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनामुळे मंगळावरील पाण्याच्या अस्तित्वाचा आणि तिथल्या हवामानातील बदलांचा नवा द़ृष्टिकोन समोर आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मंगळाच्या भूगर्भीय नोंदींमध्ये पृष्ठभागावर पाणी आणि जमिनीखालील पाण्याचे पुरावे आढळतात.
या काळात कार्बोनेट खनिजांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. कार्बोनेट तयार होण्यासाठी पाण्याची आणि कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते, त्यामुळे या प्रक्रियेमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड कमी होऊन हवामानात मोठे बदल झाले असावेत. परिणामी, मंगळाचा पृष्ठभाग काही काळासाठी राहण्यायोग्य झाला असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, तात्पुरत्या ओअॅसिस म्हणजेच अल्पकाळासाठी निर्माण होणार्या पाण्याच्या साठ्यांमुळे स्थानिक पातळीवर राहण्यायोग्य परिस्थिती निर्माण झाली असावी. या ओअॅसिसमुळे सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण तयार झाले असण्याची शक्यता आहे.
पृथ्वीवर जसे हवामान दीर्घकाळ स्थिर राहिले, तसे मंगळावर मात्र हवामानात सातत्याने बदल होत राहिले. त्यामुळे मंगळावरील राहण्यायोग्यता ही काळानुसार बदलणारी आणि मर्यादित राहिली, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या संशोधनामुळे मंगळावरील प्राचीन हवामान, पाणी आणि संभाव्य जीवसृष्टी यांचा अभ्यास करण्यासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत. भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी हे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.