मध्ययुगीन योद्ध्यांचे चिलखत ‘बुलेटप्रूफ’ होते का?
लंडन ः मध्ययुगातील योद्ध्यांचा झगझगीत लोखंडी चिलखत घालून तलवार किंवा भाला चालवणारा चेहरा आपल्या सर्वांना परिचित आहे; मात्र याच काळात अधिक प्रगत शस्त्रास्त्रेही उदयाला आली. त्यात बंदुकीचाही समावेश होता, जी गोळ्या झाडू शकत होती. हे लक्षात घेतल्यावर एक रंजक प्रश्न निर्माण होतो. मध्ययुगीन सैनिकांनी परिधान केलेले लोखंडी चिलखत हे बंदुकीच्या गोळ्यांना अडवू शकले असते का? मध्ययुगाचा अचूक कालावधी हा चर्चेचा विषय आहे, परंतु साधारण इ. स. 500 ते 1500 या कालावधीत तो मोडतो.
जरी मध्ययुगाचा संदर्भ प्रामुख्याने युरोपशी जोडला जातो, तरी काही इतिहासकार तो मध्य पूर्व आणि चीनपर्यंतही विस्तारतात. चीनमध्ये सुमारे 1,200 वर्षांपूर्वी दारूचा शोध लागला. त्यानंतर या तंत्रज्ञानाचा प्रसार संपूर्ण युरेशियामध्ये झाला आणि 14व्या शतकाच्या आधी युरोपात तोफखाना आणि बंदुका वापरल्या जाऊ लागल्या. मध्ययुगात विविध प्रकारची कवचे किंवा चिलखते विकसित होत होती. त्यापैकी सर्वांत प्रसिद्ध म्हणजे प्लेट आर्मर, जी अनेक लोहपट्ट्यांनी बनलेली असे आणि योद्ध्याच्या संपूर्ण शरीराचे संरक्षण करत असे. 13 व्या शतकात युरोपात प्लेट आर्मरचा वापर सुरू झाला आणि 15व्या शतकात ते प्रमुख संरक्षण प्रणाली बनले; मात्र बंदुकी अस्तित्वात असतानाही मध्ययुगीन योद्ध्यांना त्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता तुलनेने कमी होती. ‘13 व्या ते 15 व्या शतकात बंदुका अस्तित्वात होत्या; पण त्यांचा वापर तुलनेने कमी होता,’ असे शिकागोमधील आर्ट इन्स्टिट्यूटचे युरोपियन कला क्युरेटर जोनाथन टावारेस यांनी सांगितले.
सन 1380 ते 1600 या काळात एक प्रकारची तंत्रज्ञानीय शर्यत सुरू झाली. बंदुकीच्या वापरामुळे चिलखते अधिक मजबूत आणि जटिल बनवली जाऊ लागली. दुसरीकडे, बंदुकीचे वेग, मारक शक्ती आणि क्षमता वाढवण्यासाठी बंदुक बनवणारे नव्या पद्धती शोधू लागले. इतिहासतज्ज्ञ रॉजर पॉली यांच्या मते, ‘जर चिलखत नवीन असेल आणि बंदूक तुलनेने जुनी किंवा लहान असेल, तर बंदुकीच्या गोळ्या चिलखत भेदण्यात अपयशी ठरू शकतात.‘ मध्ययुगातील बंदुकींची क्षमता आजच्या आधुनिक बंदुकांइतकी प्रभावी नव्हती. त्या काळातील बंदुका आजच्या तुलनेत हळू होत्या आणि त्यांचे मारेकर्याचे सामर्थ्यही तुलनेने कमी होते. 2017 मध्ये ‘नोवा’ या विज्ञानविषयक टीव्ही कार्यक्रमाच्या टीमने 16व्या शतकाच्या उत्तरार्धातील ब—ेस्टप्लेट (छातीचे कवच) आणि त्या काळातील बंदूक यांची प्रतिकृती तयार केली. त्या प्रयोगात असे दिसून आले की, त्या प्लेट आर्मरने गोळी अडवली. आजच्या काळातील सैनिक बुलेटप्रूफ जॅकेटस् वापरतात, जे बंदुकीच्या गोळ्यांपासून संरक्षण देतात. ‘गोळी चिलखतावर आदळते तेव्हा चिलखतातील मजबूत फायबर तिचा वेग कमी करतात आणि तिचा प्रभाव पसरवतात’,
असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्डस् अँड टेक्नॉलॉजीने सांगितले आहे. त्यामुळे उपरोक्त प्रश्नाचे उत्तर असे आहे की, चिलखत आणि बंदुकीचा प्रकार यावर ते अवलंबून होते. नवीन आणि मजबूत चिलखत एखाद्या जुन्या किंवा कमी शक्तिशाली बंदुकीपासून संरक्षण करू शकले असते, पण जसजशी बंदुका प्रगत होत गेल्या, तसतसे चिलखतांचा प्रभाव कमी होत गेला. 16व्या शतकानंतर बंदुकीचे वर्चस्व वाढल्याने पूर्ण शरीर चिलखताचा वापर कमी होऊ लागला.

