

बकिंगहॅम : केक हा नाशवंत खाद्यपदार्थ आहे, ही बाब आपल्या सर्वांना माहितीच असेल; मात्र सध्या 80 वर्षांपूर्वीचा एक केक चर्चेत आला आहे. जवळपास 80 वर्षं जुना असलेला हा केक लाखो रुपयांना विकला गेला आहे. हा केक ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांच्याशी संबंधित आहे. या केकची लाखो रुपयांना खरेदी-विक्री का झाली, तो खाण्यायोग्य नाही तरीही त्याला लाखो रुपये किंमत का मिळाली, असे अनेक प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाहीत.
20 नोव्हेंबर 1947 रोजी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचा विवाह झाला होता. हा केक त्यांच्याच लग्नात सर्व्ह करण्यात आला होता. हा केक जवळपास आठ दशके सुरक्षित ठेवण्यात आला. त्यावर तत्कालीन राजकुमारी एलिझाबेथची चांदीची प्रतिमादेखील कोरलेली होती. आता स्कॉटलंडमध्ये या केकचा लिलाव करण्यात आला आहे. एलिझाबेथ द्वितीय आणि फिलिप यांच्या लग्नाच्या वेळी कापलेल्या केकचा हा तुकडा आहे. या दोघांच्या लग्नसोहळ्यात नऊ फूट उंच आणि 200 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा केक तयार करण्यात आला होता. सध्या लाखो रुपये किमतीला विकला गेलेला केक सुरक्षित राहावा यासाठी एका बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता. हा बॉक्स बकिंगहॅम पॅलेसमधून एडिनबर्ग इथल्या होलीरूड हाऊसमध्ये घरकाम करणार्या मेरियन पोल्सन यांना राणीने पाठवला होता. भव्य लग्नसोहळ्यानंतर भेटवस्तूच्या रूपात मेरियन यांना हा केकचा तुकडा पाठवण्यात आला होता. याच तुकड्याला आता 2.36 लाख रुपये (2,800 डॉलर्स) किंमत मिळाली आहे.
एलिझाबेथ द्वितीय आणि फिलिप यांच्या सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या केकचे दोन हजारांहून अधिक तुकडे करण्यात आले होते. उर्वरित केक धर्मादाय संस्था आणि इतर संस्थांना पाठवण्यात आला होता. याच केकचा एक तुकडा प्रिन्स चार्ल्सच्या नामकरणविधीसाठी (बाप्तिस्मा) बाजूला ठेवण्यात आला होता. राजघराण्यातल्या शाही केकची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक दशकांपूर्वीच्या शाही केकचे तुकडे विकले गेले आहेत. 2013मध्ये अशाच एका वेडिंग केकच्या तुकड्याला 2300 डॉलर्स (सुमारे 2 लाख रुपये) किंमत मिळाली होती. किंग चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या लग्नात सर्व्ह केलेल्या केकचा देखील 2021 साली लिलाव करण्यात आला होता. त्याला 2,565 डॉलर्स (2.25 लाख रुपये) किंमत मिळाली होती.