

ह्युस्टन : अमेरिकेतील ह्युस्टन शहरात एक कुटुंब अस्मानी आपत्तीपासून थोडक्यात बचावले. अंतराळातून आलेला कलिंगडाच्या आकाराचा एक मोठा दगड (उल्का) घराचे छप्पर फोडून थेट एका रिकाम्या बेडरूममध्ये कोसळला. टेक्सासच्या निळ्याशार आकाशात मोठ्या आवाजासह फुटलेल्या एका महाकाय उल्केचा हा तुकडा असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
शनिवारी (21 मार्च) दुपारी साधारण 4.40 च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ‘नासा’च्या अहवालानुसार, सुमारे 3 फूट रुंद असलेला एक लघुग्रह ताशी 56,300 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरला. हवेच्या घर्षणामुळे या दगडाचे तुकडे झाले, ज्यामुळे आकाशात मोठा प्रकाश आणि प्रचंड आवाजाचा ‘सोनिक बूम’ निर्माण झाला. या स्फोटाची तीव—ता तब्बल 26 टन टीएनटी स्फोटकाइतकी होती. ह्युस्टनच्या उत्तरेकडील स्प्रिंग एरियामध्ये राहणार्या शेरी जेम्स यांच्या घरावर या उल्केचा एक तुकडा पडला. हा दगड छप्पर फोडून आत शिरला, जमिनीवर आदळला आणि पुन्हा छताला घासून टीव्हीच्या शेजारी येऊन थांबला.
शेरी यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले तेव्हा सुरुवातीला हा विमानाचा एखादा भाग असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, बारकाईने पाहणी केल्यावर तो अंतराळातील दगड असल्याचे स्पष्ट झाले. ज्या खोलीत ही उल्का पडली तिथे त्यावेळी कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अमेरिकन मेटिओर सोसायटीच्या मते, गेल्या काही दिवसांत अमेरिकेच्या विविध भागांत अशा अनेक ‘फायरबॉल्स’ (अग्निकांडसद़ृश उल्का) आकाशात दिसल्या आहेत. सध्या ही संख्या अचानक का वाढली आहे, याचे ठोस कारण अद्याप शास्त्रज्ञांना शोधता आलेले नाही. 180 हून अधिक लोकांनी आकाशात हा प्रकाश पाहिल्याची नोंद केली आहे.