

लंडन : आपल्या दैनंदिन जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेले 'पाणी' केवळ एक साधा द्रव पदार्थ नसून, ते प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या द्रवांचे गुप्त मिश्रण असू शकते, असा एक अत्यंत आश्चर्यकारक दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. पाण्याच्या या अनोख्या गुणधर्मामुळे वैज्ञानिक जगतात नवीन चर्चा सुरू झाली आहे.
आपल्याला परिचित असलेले पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या कणांनी बनलेले असते. सामान्यतः आपण पाण्याला एकसंध (एकसारखा) द्रव मानतो. परंतु, शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय गटाने केलेल्या संशोधनानुसार, अत्यंत कमी तापमानात पाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संरचना किंवा 'फेजेस'मध्ये अस्तित्त्वात राहू शकते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पाण्याला अति-थंड (Supercooled) केले जाते, तेव्हा ते बर्फात रूपांतरित न होता द्रव अवस्थेतच राहते. या स्थितीत पाण्याच्या घनतेमध्ये दोन प्रकार आढळतात. कमी घनतेचा द्रव : यामध्ये पाण्याचे रेणू एकमेकांपासून थोडे दूर आणि एका विशिष्ट संरचनेत असतात.
जास्त घनतेचा द्रव : यामध्ये पाण्याचे रेणू एकमेकांच्या अत्यंत जवळ आणि विखुरलेल्या अवस्थेत असतात. शास्त्रज्ञांच्या मते, आपण जे सामान्य पाणी पितो किंवा वापरतो, ते प्रत्यक्षात या दोन वेगवेगळ्या घनता असलेल्या द्रवांचे अतिशय वेगाने बदलणारे मिश्रण असू शकते. सामान्य तापमानाला हे बदल इतक्या मायक्रोसेकंदच्या गतीने होतात की आपल्याला पाणी एकच द्रव असल्यासारखे वाटते. पाण्याच्या या विचित्र वर्तनाला वैज्ञानिक भाषेत 'लिक्विड-लिक्विड क्रिटिकल पॉईंट' म्हटले जाते. या सिद्धांतावर अनेक वर्षांपासून वाद सुरू होते; परंतु प्रगत क्ष-किरण तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटर सिम्युलेशनच्या मदतीने शास्त्रज्ञांनी या दाव्याला भक्कम पुरावे दिले आहेत.