

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लूव संग्रहालय जगप्रसिद्ध आहे. याच भव्य संग्रहालयात लिओनार्डो दा विंची यांची अजरामर कलाकृती ‘मोनालिसा’ पाहायला मिळते. जगभरातून असंख्य पर्यटक हे संग्रहालय पाहण्यासाठी येत असतात. मात्र, हल्ली या संग्रहालयातील अव्यवस्थेच्या बातम्याच अधिक येऊ लागल्या आहेत. येथील इजिप्तच्या पुरावशेष विभागात गेल्या महिन्यात पाण्याची गळती झाल्यामुळे शेकडो पुस्तके खराब झाली असल्याचे आता पुढे आले आहे. या घटनेमुळे संग्रहालयाच्या खालावत चाललेल्या स्थितीकडे लक्ष वेधले गेले आहे. कारण, यापूर्वीच येथे चोरीच्या घटनांमुळे सुरक्षा त्रुटी उघड झाल्या होत्या.
विशेषज्ञ वेबसाईट ‘ला ट्रिब्यून दे ला आर्ट’ ने दिलेल्या माहितीनुसार, पाणी गळतीमुळे सुमारे 400 दुर्मीळ पुस्तके प्रभावित झाली आहेत. यासाठी खराब झालेल्या पाण्याच्या पाईप्सना जबाबदार धरण्यात आले आहे. संग्रहालयाचा हा विभाग बऱ्याच काळापासून आपल्या संग््राहांना अशा जोखमींपासून वाचवण्यासाठी निधीची मागणी करत होता; पण त्यात त्यांना यश आले नाही, असेही या वेबसाईटने नमूद केले. लूव संग्रहालयाचे उपप्रशासक फ्रान्सिस स्टीनबाक यांनी माहिती दिली की, पाण्याची पाईपलाईन गळती इजिप्तच्या पुरावशेष विभागाच्या लायबरीमधील तीनपैकी एका खोलीशी संबंधित होती.