

जयपूरः राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगडमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे बोअर खोदत असताना अचानक जमिनीतून आवाज झाला आणि पाण्याचा मोठा फवारा उसळून वर आला. या खड्ड्यातून वेगाने पाणी वर येत होतं. धक्कादायक बाब म्हणजे खोदकामाची उपकरणं आणि ट्रकदेखील या खड्ड्यात गेला. या घटनेनंतर मोहनगडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाळवंटी भागात अचानक पाण्याचा मोठा फवारा वर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम सिंह भाटी यांच्या शेतात बोअरवेलचं खोदकाम सुरू होतं. त्यानंतर अचानक जमीन फाटली आणि दबावाने पाणी, गॅस बाहेर येऊ लागला. याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर 500 मीटरपर्यंतचा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जवळपास 850 फुटांपर्यंत बोअरवेल खोदण्यात आली होती. पाण्याचा शोध सुरू असताना अचानक जमिनीवरून मोठ्या वेगाने पाणी बाहेर येऊ लागलं. यावेळी मशिनीसह ट्रकही जमिनीत गाडला गेला आणि पाण्याचे 10 फूट उंच कारंजे उडू लागले. पाण्याच्या कारंज्यासह गॅसही बाहेर येऊ लागला. गॅस बाहेर येऊ लागल्याने गावकर्यांसह प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हा गॅस कसला आहे, याचा शोध घेण्यासाठी ओएनजीसी, केअरन एनर्जी, ऑईल इंडियाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे आजूबाजूचा 500 मीटरहून अधिकच्या परिसराला तलावाचं रूप आलं होतं. वाळवंटात पाण्याचे झरे वाहू लागल्याने अनेक अफवादेखील पसरू लागल्या. याठिकाणाहून आधी सरस्वती नदी वाहत होती आणि याच लुप्त झालेल्या प्राचीन सरस्वती नदीचा पुन्हा उगम झाल्याचा दावा केला जात आहे.