

वॉशिंग्टन : आपण रोज कशी आणि किती झोप घेतो, याचा आपल्या वाढत्या वयानुसार मेंदूच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. नुकत्याच झालेल्या 'युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना'च्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, झोपेशी संबंधित काही सामान्य सवयी मेंदूला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलणाऱ्या लक्षणांशी जोडलेल्या असू शकतात. हा अभ्यास प्रसिद्ध 'अल्झायमर्स अँड डिमेंशिया' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी एका मोठ्या बायोमेडिकल डेटाबेसमधून २३,००० हून अधिक मध्यमवयीन आणि वृद्ध व्यक्तींच्या मेंदूचे स्कॅन आणि त्यांच्या झोपेशी संबंधित उत्तरांचे विश्लेषण केले. सुमारे ९ वर्षांच्या अंतरानंतर या सर्वांचे 'ब्रेन एमआरआय' करण्यात आले होते.
या संशोधनात निरोगी लोकांमध्ये मेंदूच्या वृद्धत्वाशी संबंधित तीन प्रमुख सवयी प्रकर्षाने आढळून आल्या. १) शिफारस केलेल्या ७ ते ९ तासांपेक्षा कमी किंवा जास्त झोप घेणे, २) दिवसा वारंवार किंवा जास्त वेळ झोपणे, ३) निद्रानाश किंवा अपुरी झोप. या तिन्ही सवयींचा संबंध मेंदूतील 'व्हाईट मॅटर लेशन्स' म्हणजेच मेंदूतील ऊतींच्या नुकसानीशी (डॅमेज) जोडलेला आढळला. वयोमानानुसार मेंदूमध्ये हे बदल होतात आणि यामुळे पुढे जाऊन विसरभोळेपणा किंवा अल्झायमर्ससारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. संशोधनानुसार, रात्री ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये मेंदूचे नुकसान होण्याचे प्रमाण लक्षणीय होते.
अभ्यासाचे वरिष्ठ लेखक आणि मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक जीन अलेक्झांडर यांनी सांगितले, ‘या संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या तिन्ही सवयी अशा आहेत, ज्या आपण स्वतःहून बदलू शकतो. जर आपण आपल्या झोपेचा दर्जा सुधारला, तर मेंदूचे वय वाढण्याची प्रक्रिया मंदावू शकते आणि अल्झायमर्सचा धोकाही कमी करता येऊ शकतो.’ हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना आणि युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, आगामी काळात दिवसा घेतलेल्या छोट्या आणि मोठ्या झोपेचा मेंदूवर नेमका काय परिणाम होतो, यावर अधिक संशोधन केले जाणार आहे.