

वॉशिंग्टन : नासाच्या अभियंत्यांनी व्होयेजर 1 आणि व्होयेजर 2 या जोड अंतराळ यानांना सौरमालेच्या पलिकडे दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी दोन वैज्ञानिक उपकरणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) मधील अभियंत्यांनी नुकताच व्होयेजर 1 वरील कॉस्मिक रे सबसिस्टम प्रयोग बंद केला. तसेच, मार्च 24 रोजी व्होयेजर 2 वरील कमी-ऊर्जेचे चार्ज्ड पार्टिकल उपकरण बंद करण्यात येईल. 1977 मध्ये प्रक्षेपित झालेल्या व्होयेजर 1 आणि व्होयेजर 2 या यानांनी अनुक्रमे 2012 आणि 2018 मध्ये आपल्या सौरमालिकेबाहेर इंटरस्टेलर (तारामंडलांतील) प्रदेशात प्रवेश केला.
या दोन यानांनी एकत्रित 29 अब्ज मैलांचे अंतर कापले असून ती पृथ्वीपासून सर्वात दूर जाणारी मानवनिर्मित उपकरणे बनली आहेत. ‘व्होयेजर यान अंतराळ संशोधनातील दिग्गज आहेत आणि त्यांना शक्य तितक्या जास्त काळ कार्यरत ठेवायचे आहे,’ असे नासा गझङ मधील व्होयेजर प्रकल्प व्यवस्थापक सुझान डॉड यांनी सांगितले; ‘पण त्यांची वीजनिर्मिती क्षमता झपाट्याने कमी होत आहे. जर आम्ही काही उपकरणे बंद केली नाहीत, तर यान केवळ काही महिन्यांसाठीच कार्यरत राहू शकतील!’ व्होयेजर यानांमध्ये प्लुटोनियमच्या रेडिओअॅक्टिव्ह क्षयाद्वारे निर्माण होणार्या उष्णतेतून वीज निर्मिती करणारी प्रणाली आहे. दरवर्षी या प्रणालीमधून व्होयेजर 1 आणि व्होयेजर 2 यांची ऊर्जा सुमारे 4 वॅटने कमी होत जाते. 1980च्या दशकात दोन्ही यानांनी सौरमालेतील विशाल ग्रहांचे निरीक्षण पूर्ण केल्यानंतर, काही वैज्ञानिक उपकरणे बंद करण्यात आली होती. यामुळे यानांचे आयुष्य वाढवणे शक्य झाले. ‘नासा’च्या या निर्णयामुळे व्होयेजर 1 आणि 2 आणखी काही वर्षे तारामंडलाच्या अगम्य भागात संशोधन करत राहू शकतील. पुढील काळात यानांच्या ऊर्जेचा योग्य वापर करत, त्यांनी आपली ऐतिहासिक मोहीम शक्य तितक्या लांबवावी, हा नासाचा प्रयत्न असेल.